महापालिकेचे नवीन सहआयुक्त अजित कुंभार

आशुतोष सलील यांच्या पदावर अजित कुंभार यांची नियुक्ती केली.

मुंबई महापालिकेचे सहआयुक्त आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक असलेल्या आशुतोष सलील यांच्या खांद्यावरील महापालिकेचा भार हलका करण्यात आला आहे. महापालिकेच्या सह आयुक्त पदावरून त्यांना मुक्त करण्यात आले आहे. या रिक्त जागी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या अजित कुंभार यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली. कुंभार हे २०१५ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत.

आशुतोष सलील यांच्या पदावर झाली नियुक्ती

मुंबई महापालिकेच्या सहआयुक्त पदी असलेल्या निधी चौधरी यांनी बदली झाल्यानंतर या रिक्तपदी आशुतोष सलील यांची वर्णी लागली होती. प्रारंभी त्यांच्याकडे आय.टी., परवाना विभाग आणि विधी व दक्षता विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त प्रविण सिंह परदेशी यांनी सलील यांच्याकडे शिक्षण विभागाची जबाबदारी देत त्यांना स्वतःच्या अधिपत्याखाली ठेवले होते. शिक्षण विभागाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे न देता ते अधिकार त्यांनी सलील यांना दिले होते. तसेच आयुक्तांनी तेव्हा रस्ते व अन्य विभागाची जबाबदारी स्वतःकडे घेत ती सलील यांच्याकडे सोपवली होती. मात्र त्यानंतर सलील यांची वर्णी एमटीडीसीच्या महाव्यवस्थापक पदी करताना महापालिका सहआयुक्त पदाची जबाबदारी कायम ठेवली होती. परंतु मागील महिन्यात शिक्षण विभागाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे सलील यांना आयुक्त ऐवजी अतिरिक्त आयुक्त यांच्या निर्देशानुसार काम करावे लागणार असून आजवर पूर्णपणे या विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सलील यांना अश्विनी भिडे यांच्या अधिपत्याखाली काम करणे हे रुचणारे नसल्याने त्यांनी आपल्याला सहआयुक्त पदावरून मुक्त करण्यासाठी जोरदार हालचाली केल्या होत्या. त्यानुसार शासनाने त्यांना या पदावरून मुक्त करत त्यांच्या जागी अजित कुंभार यांची नियुक्ती केली आहे.

(हेही वाचा : उद्यान, मैदानांच्या कंत्राटदारांचे ऑडिट करूनच बिले द्या! भाजपचा महापालिकाकडे मागणी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here