विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील भटके श्वान किंवा पाळीव प्राण्यांचे लसीकरण, निर्बिजीकरण करणे यासह प्राण्यासंदर्भात तक्रारी नोंदवण्यासाठी तसेच प्राणी कल्याणाशी संबंधित विविध उपाययोजनांची माहिती, प्राण्यांसाठी काम करणारे विविध शासकीय विभाग किंवा संस्था इत्यादी माहितीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने ऑनलाइन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या मायबीएमसी (MyBMC) मोबाइल ॲप्लिकेशन किंवा संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर जाऊन नागरिक या व्यवस्थेचा लाभ घेऊ शकतो.
मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, उप आयुक्त (विशेष) किरण दिघावकर यांच्या पर्यवेक्षणाखाली मुंबई महानगरातील भटके आणि पाळीव श्वानांसंदर्भात महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
(हेही वाचा – BMC : अपघातात गंभीर जखमी श्वानाला बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रेल्वेच्या समन्वयामुळे मिळाली वैद्यकीय मदत, प्राण वाचले)
पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिमपाशा पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) उपलब्ध करुन दिलेल्या या ऑनलाइन सुविधेमध्ये प्राण्यासंदर्भात महानगरपालिकेकडून केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, सोयी-सुविधांची माहिती, प्राण्यांसाठी कार्यरत विविध शासकीय विभाग किंवा संस्था आदी माहिती नागरिकांसाठी देण्यात आलेली आहे.
भटके किंवा पाळीव श्वानांचे लसीकरण करणे, निर्बिजीकरण करणे तसेच त्यांच्या अनुषंगाने काही तक्रारी किंवा विनंती असल्यास नागरिकांना मायबीएमसी (MyBMC) मोबाइल ॲप्लिकेशनवर जाऊन त्या नोंदवता येतील. www.mcgm.gov.in या संकेतस्थळावरावरील https://vhd.mcgm.gov.in/register-grievance या लिंकवर जाऊनही विनंती किंवा तक्रार नोंदवता येईल.
लिंकवर क्लिक केल्यानंतर तक्रार किंवा विनंती यापैकी एकाची निवड करून त्याअंतर्गत विहित माहिती भरावी लागेल. माहिती नोंदवल्यानंतर संबंधित विनंती किंवा तक्रारीसाठी एक विशिष्ट क्रमांक तयार होईल आणि तो नागरिकाच्या थेट मोबाइल क्रमांकावर उपलब्ध होऊ शकेल. या क्रमांकाच्या आधारे नागरिक तक्रार किंवा विनंतीच्या कारवाईबाबतच्या स्थितीचा वेळावेळी आढावा घेऊ शकतील.
(हेही वाचा – तब्बल 46 वर्षांनी उघडले Jagannath Temples चे रत्न भांडार; किती असणार मंदिर संपत्ती?)
लहान आकाराच्या मृत पाळीव प्राण्यांच्या दहनासाठीही ऑनलाइन नोंदणीची सुविधा
महानगरपालिकेच्या वतीने मालाड येथील स्मशानभूमीमध्ये लहान आकाराच्या पाळीव मृत प्राण्यांच्या दहनासाठी सुविधा देण्यात आली आहे. नागरिकांना त्यांच्याकडील सुमारे ५० किलो वजनापेक्षा कमी वजनाच्या मृत प्राण्यांचे या स्मशानभूमीत दहन करण्यासाठी आता ऑनलाइन पद्धतीने वेळेची नोंदणी करता येणार आहे. https://vhd.mcgm.gov.in/incineration-booking या लिंकवर ही सुविधा उपलब्ध आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना मृत प्राण्यासंदर्भात संपूर्ण माहिती भरुन द्यावी लागेल. तसेच नोंदणी प्रक्रियेपासून पुढील दोन दिवसांच्या आत (आज किंवा उद्या यापैकी एक असं) नेमक्या कोणत्या वेळेत प्राण्याचे दहन करावयाचे आहे, त्या वेळेची (स्लॉट) निवड करावी लागेल.
मालाड येथे दुपारी १२ आणि दुपारी ४ वाजता असे दोनदा मृत प्राण्यांचे दहन केले जाते. त्यामुळे नागरिकांनी या दोन्ही दहन कालावधीच्या पूर्वीचीच वेळ निवडावी. नोंदणी तसेच विहित वेळेसंदर्भातील माहिती नागरिकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर नोंदणीनंतर उपलब्ध होईल. निवडलेल्या विहित वेळेत मालाड येथील स्मशानभूमीमध्ये त्यांना प्राण्याचे अंत्यविधी करता येईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community