महापालिका अधिकारी फेरीवाल्यांपुढे हतबल: जावळे मार्गाचे काम धीम्या गतीने सुरू

99

दादर पश्चिम येथील एम.सी.जावळे मार्गाचे डांबरीकरण आणि याच्या संलग्न काही पदपथांचा विकास करण्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. या मार्गावरील डांबराचा स्तर काढून डांबरीकरण करण्यात येणाऱ्या या रस्त्याचे काम दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्ण होण्याऐवजी येथील फेरीवाले आणि अनधिकृत उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे विलंबाने होत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांसाठी दोन दिवस हा रस्ता बंद ठेवून या रस्त्यांसह सर्व पदपथांचा विकास करता येण्यासारखा असतानाही प्रशासनाचे अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने फेरीवाल्यांपुढे महापालिकेचे अधिकारी हतबल ठरत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी रस्त्यांसह संलग्न पदपथांची कामे विलंबाने होत असून पादचाऱ्यांसह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या समोरील रस्त्यांच्या संलग्न पदपथांचा विकास मागील १० ते १५ वर्षांपासून झालेला नसून या पदपथांची सुधारणा करून यामुळे नागरिकांची आदळआपट होणारी समस्या कमी करावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या स्थानकाच्या रस्त्यांच्या संलग्न पदपथांचे पेव्हरब्लॉक उखडले गेल्याने तसेच असमांतर असल्याने या खाचखळग्यात पाय मुरगळून किंवा पावसात त्यातील पाण्याचे तथा चिखलाचे शिंतोंडे अंगावर उडत असल्याने या पदपथांमुळे नागरिकांना होणारा त्रास यापूर्वी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने वारंवार मालिकेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आता येथील रस्त्यांचे डांबरीकरण करताना या रस्त्यांच्या संलग्न पदपथांची सुधारणा करण्याच्याही कामांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यानुसार दादर पश्चिम येथील एम.सी.जावळे मार्गांचे डांबरीकरण केले जात असून त्या रस्त्यांच्या पदपथांचीही सुधारणा करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. परंतु एस.सी. जावळे मार्गांचे काम मागील चार ते पाच दिवसांपासून सुरु असून  या रस्त्यावरील डांबराचा स्तर खरवडून काढून त्यानंतर डांबराचा स्तर चढवत त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. हे काम किमान दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु फेरीवाल्यांसह रस्त्यांवर उभी केलेली वाहने यामुळे या रस्त्याच्या विकासाचे काम धिम्यागतीने होत असल्याचे दिसून येत आहे.

( हेही वाचा: RBI ने ‘या’ बँकेवर केली मोठी कारवाई; तुमचं खात तर नाही ना? )

या रस्त्यांवर वरळीला जाणाऱ्या बेस्ट बसेससह सिध्दीविनायक मंदिराला जाणाऱ्या शेअर टॅक्सी यांची वर्दळ असते. त्यामुळे येथील सर्व फेरीवाल्यांना दोन दिवस व्यवसाय बंद ठेवायला लावून या रस्त्यासह पदपथाचाही विकास करता येणे शक्य असतानाही महापालिकेचे अधिकारी हे फेरीवाल्यांपुढे हतबल ठरत असल्याने ते याबाबत कोणताही निर्णय घेताना दिसत नाही. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यांचा विकास करताना जर एखादा रस्ता पूर्णपणे बंद केला जात असताना या रस्त्यांवर दिवसभर वाहतूक आणि फेरीवाल्याचा व्यवसाय सुरु ठेवून रात्रीचे काम करत कुणाचे हित जोपासले जात आहे.  या रस्त्याचा आणि यांच्या संलग्न पदपथांचा विकास होणे हे आवश्यक असून दोन्ही कामे एकाचवेळी करणे शक्य असतानाही प्रशासनाने ही कामे न केल्याने प्रशासनातील नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना महापालिकेचे अधिकारी घाबरतात अशाच प्रकारचा संदेश महापालिकेने या कामांमधून दिल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.