ब्रेक दि चेन अंतर्गत राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधांबाबत मुंबई महापालिकेने नवीन आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये 21 जूनपासून 27 जूनपर्यंत मुंबईत लेव्हल-3 चे असलेले निर्बंध जसेच्या तसे लागू करण्यात आल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
लेव्हल-3चे निर्बंध कायम
राज्य शासनाकडून 4 जून रोजी कोव्हिड-19 प्रतिबंधासाठी नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेनुसार स्थानिक प्रशासनाने निर्बंध शिथिल करण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार मुंबईत सध्या रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर 3.97 टक्के इतका असून, ऑक्सिजन बेडच्या व्याप्तीचा दर 23.56 टक्के इतका आहे. त्यामुळे सध्या मुंबईत लेव्हल-3 चे असलेले निर्बंध कायम ठेवण्यात आल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
(हेही वाचाः तिसऱ्या लाटेच्या दिशेने…)
म्हणून मुंबई लेव्हल-३ मध्येच
मुंबई महापालिका क्षेत्र हे लेव्हल-1 मध्ये अंतर्भूत होत असले तरी, मुंबई शहराची भौगोलिक रचना आणि लोकसंख्या, मुंबईत लोकलने दररोज येणारे प्रवासी आणि कोव्हिडच्या तिस-या लाटेबाबत तज्ज्ञांनी वर्तवलेली शक्यता, यामुळे मुंबईत लेव्हल-3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश महापालिकेकडून देण्यात आले आहेत.
हे आहेत निर्बंध
- अत्यावश्यक दुकाने सर्व दिवस सकाळी ७ ते ४ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ सर्व खुले राहतील
- माॅल्स थिएटर्स सर्व बंद राहतील
- हाॅटेल्स सोमवार ते शुक्रवार ५० टक्के सायंकाळी ४ पर्यंत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील
- लोकल रेल्वे बंद राहतील
- मॉर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा
- खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील
- शासकीय कार्यालय ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील
- आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते रात्री ९.
- स्टुडियोत चित्रीकरण परवानगी
- मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के सायंकाळी ४ पर्यंत, सोमवार ते शुक्रवार.
- लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील
- बांधकाम सायंकाळी ४ वाजेपर्यंत मुभा
- कृषी सर्व कामे मुभा
- ई काॅमर्स सुरु ठेवू शकतो
- जमावबंदी सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यानंतर संचारबंदी