पूर्व उपनगरांमधील कुर्ला परिसरातील दाटीवाटीने वसलेल्या वस्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणात पाण्याच्या गळत्या होऊन शेकडो लिटर पाणी वाया जात होते. परंतु या गळती शोधून त्यांची दुरुस्ती करण्यासाठी हाती घेतलेल्या कामांमध्ये मागील २२ महिन्यांमध्येच कुर्ला परिसरातील १०९२ गळती दुरुस्ती करण्यात महापालिकेला यश आले आहे. या कालावधीमध्ये विद्यमान जलवाहिन्यांपासून होणाऱ्या १०९२ गळत्या दूर करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
( हेही वाचा : केईएम रुग्णालयाच्या जुन्या लिफ्ट अखेर बदलणार : १३ नवीन लिफ्ट बसवणार )
कुर्ला परिसरातील जलवाहिन्यांच्या जाळ्यांमधून होणारी पाण्याची गळती थांबवणे, दुषित पाण्याचे प्रमाण कमी करकणे, अपुऱ्या पाण्याची समस्या सोडवणे आदीसंदर्भातील कामांसह आवश्यक असल्यास नवीन जलवाहिनी टाकणे, जुन्य गंजलेल्य जलवाहिनी बदलणे तसेच सिमेंट काँक्रिट व पावसाळी वाहिन्यांच्या कामांच्या आड येणाऱ्या जलवाहिनी बदणे आणि इतरत्र हलवणे आदी कामांसाठी यापूर्वी नेमलेल्या कंत्राटदाराच्या माध्यमातून महापालिकेने २४ ऑगस्ट २०२० ते ३० जुन २०२२ या कालावधीमध्ये विद्यमान जलवाहिन्यांपासून होणाऱ्या १०९२ गळत्या दूर केल्या आहेत. तर सिमेंट काँक्रिटीकरणामुळे तसेच पावसाळी गटारांमधून जाणाऱ्या २३ जलवाहिन्या अन्यत्र हलवल्या गेल्या, तर ४१ जुन्या व गंजलेल्या जलवाहिनी बदलल्या गेल्या असल्याचा दावा जलअभियंता विभागाने केला आहे.
त्यामुळे पुढील दोन वर्षांकरता जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसह नवीन जलवाहिन्या टाकण्यास गळती दुरुस्ती करण्यासाठी मागवलेल्या निविदांमध्ये योगेश कस्ट्रक्शन ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीला पुढील दोन वर्षांच्या जलवाहिनी दुरुस्ती व बदलण्यासह गळती दुरुस्तीकरता १३. ९७ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.