झाडांवरील पक्ष्यांच्या घरट्यांवर महापालिकेची ‘घारी’ची नजर

132

मुंबईत मान्सून पूर्व झाडांच्या धोकादायक फांद्या तसेच मृत झाडे कापली जातात. झाडांच्या मृत फांद्या कापताना सरसकट सर्व फांदयांची खोडापर्यंत कापणी केली जाते. ही कापणी होत असताना बऱ्याच वेळा पक्ष्यांची घरटी नष्ट व्हायची आणि त्यात असलेल्या पक्ष्यांच्या पिल्लांचा जीव जायचा. मात्र, यंदापासून झाडांच्या वाढलेल्या तथा धोकादायक फांद्या तोडताना आधी पक्ष्यांचे वास्तव्य तिथे आहे का? त्या घरट्यांमध्ये पक्ष्याची अंडी किंवा पिल्ले आहेत का हे प्रथम पाहिले जाईल आणि पक्ष्याची घरटी नसल्याची जाणीव झाल्यानंतरच त्या झाडांच्या फांद्या छाटल्या जातील. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या कापताना महापालिकेच्या उद्यान विषयक अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांना अशाप्रकारचे निर्देश दिल्याने यंदा तरी पक्ष्यांच्या निवाऱ्याचे संरक्षण होईल, असे बोलले जाते.

( हेही वाचा : महाराष्ट्र झाला निर्बंधमुक्त; आता मास्क वापरणे ऐच्छिक, गुढीपाडवा शोभायात्रांना परवानगी )

मुंबईत मुसळधार पावसात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडतात तसेच अनेक झाडांच्या फांदया तुटून पडतात. या दुघर्टनांमध्ये अनेक लोकांचे बळी जातात तसेच काही जखमीही होतात. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मान्सून पूर्व मुंबईतील रस्त्यालगतच्या झाडांच्या धोकादायक फांद्या आणि मृत झाडांची कापणी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदारांची नेमणूक केली जाते. त्यानुसार महापालिकेकडे कंत्राटदार नियुक्त असून त्यांची मुदत जून महिन्यापर्यंत आहे. तर नवीन कंत्राटदाराच्या निवडीची निविदा प्रक्रिया सुरु आहे.

त्यानुसार झाडांच्या फांद्यांची तसेच मृत झाडांची कापणी संदर्भातील झाडांचा सर्वे करण्यात आला असून त्यातीलच झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाणार आहे. महापालिकेच्या नियमानुसार झाडांचा तोल एका बाजूला जात असेल तर त्यांचा भार संतुलित करण्याच्यादृष्टीने शास्त्रोक्तपणे त्यांची छाटणी व्हायला हवी. त्यामुळे एका बाजूला झुकलेल्या फांद्यांची छाटणी होणे बंधनकारक असते. परंतु लाकडाच्या हव्यासापोटी कंत्राटदार शास्त्रोक्तपणे झाडांची छाटणी न करता खोडापर्यंत फांद्या छाटून त्या झाडाला बोडके केले जाते. ज्यामुळे झाडांच्या काही उंचीपर्यंत खोडाचा भाग उभा राहिलेला दिसतो.

झाडांच्या फांदी छाटणीवर विशेष लक्ष

मुलुंडमध्ये अशाप्रकारे नवीन लावलेल्या वडाच्या झाडांच्या सर्व फांद्या छाटून खोडापर्यंत झाड ठेवल्याने संबंधित कंत्राटदाराला दहा हजारांचा दंड महापालिकेने केला होता. परंतु यावर्षी पक्षीप्रेमी संघटनांच्या मागणीनुसार अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी यंदा झाडांच्या छाटणीमध्ये पक्ष्यांच्या घरट्यांचे जतन करण्याच्यादृष्टीने घरटी आणि त्यातील पक्ष्यांची अंडी अथवा पिल्ले यांना कुठेही धक्का पोहोचणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. उद्यान विभागाचे उपायुक्त रमाकांत बिरादर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यंदा झाडांच्या फांदी छाटणीवर विशेष लक्ष ठेवून आहेत आहे.

यासंदर्भात बोलतांना जितेंद्र परदेशी यांनी रस्त्यालगतच्या झाडांची काळजी महापालिका घेणारच असून खासगी जागेतील जसे की सोसायटी व चाळींमधील झाडांच्या फांद्या धोकादायक वाढल्या असल्यास महापालिकेशी संपर्क साधून त्या तोडून घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून यामुळे होणारी संभाव्य दुघर्टना टाळता येईल.

पक्ष्यांचे संरक्षण होणार 

महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवरील झाडांचा सर्वे पूर्ण झाला आहे. त्यामुळे या सर्वेत ज्या झाडांच्या फांद्या धोकादायक असतील अथवा झाडे मृत पावली असतील ती तोडली जातील. विशेष म्हणजे दरवर्षी फांद्यांची छाटणी करताना पक्ष्यांची घरटी त्यावर असताना त्यांना धक्का पोहोचतो. अंडी फुटून जातात, पक्ष्यांची पिल्ले मरुन जातात. याबाबत पक्षी प्रेमी तसेच इतर संस्थांनी केलेल्या मागणीचा विचार करता यंदा कोणत्याही झाडांच्या फांद्या तोडताना त्यावर कावळा, कोकिळा, पोपट किंवा अशाप्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या पक्ष्यांची घरटी असल्यास त्याला धक्का पोहोचणार नाही अशाप्रकारे छाटणी केली जाईल. जेणेकरून या माध्यमातून पक्ष्यांचे संरक्षण होईल आणि त्यांच्या संख्येतही वाढ होईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत अनेक चाळी, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जागेत असंख्य जुनाट वृक्ष आहेत. या झाडांच्या फांद्या छाटणीसाठी महापालिकेच्यावतीने अवाजवी दर आकारला जातो. जे दर नागरिक आणि गृहनिर्माण सोसायटींना परवडत नाही. त्यामुळे ते झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यास टाळाटाळ करतात. अशा प्रकरणांमध्ये महापालिकेच्यावतीने खासगी मालमत्तेमधील झाडांच्या फांद्यांची छाटणी मोफत करण्याची मागणी भाजपचे तत्कालिन नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी २०१९मध्ये केली होती. याकरता महापालिकेच्या धोरणात बदल करण्याची मागणी गंगाधरे यांनी तत्कालिन महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती, पण आजतागायत त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.