भायखळयातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीबाग) आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्याची निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आहे. परंतु राणीबागेत छोट्या स्वरुपाचे मत्स्यालय उभारण्यात येत असताना केवळ कंत्राटदाराला मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारणीचा प्रस्ताव तयार करून निविदा मागवण्यात आली होती. परंतु निविदेच्या प्री-बीड बैठकीतच राणीबागेतील पेंग्विन कक्षामधील जागेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारता येणार नाही. ती जागा त्यासाठी पुरेशी नाही,अशाप्रकारची बाब कंत्राटदारांनीच निदर्शनास आणून दिल्याने अखेर प्रशासनाने याबाबतची निविदा रद्द करून हा प्रस्तावच गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा : एकनाथ शिंदेच्या चार अटी, नको महाविकास आघाडी! )
बोगद्यासारख्या गोलाकार पद्धतीने दोन भागात मत्स्यालय उभारण्यात येणार
राणीबागेत पेंग्विन प्रदर्शनी सुरू झाल्यानंतर पर्यटकांची प्राणिसंग्रहालयात रोज मोठी झुंबड उडते आहे. सोबतीला नव्याने दाखल झालेले विविध वन्य पशुपक्षी, प्राणी याठिकाणी पाहायला मिळत असल्याने पर्यटकांना रपेट करता येते. त्यामुळे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयाची उभारणी करण्याचे निश्चित करत यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पेंग्विन प्रदर्शनी जवळच सुमारे सहाशे चौरस मीटर जागेवर हे मत्स्यालय उभारण्यात येणार होते. यामध्ये घुमटाकार स्वरूपाच्या प्रवेश मार्गाने शिरतांना तेथे जणू समुद्रात उतरून मत्स्य जीवन आणि जल वैविध्य पाहता येईल अशी रचना होती. तेथून पुढे बोगद्यासारख्या गोलाकार पद्धतीने दोन भागात मत्स्यालय उभारण्यात येणार होते.
आंतरराष्ट्रीय मत्स्यालयाकरता पुरेशी जागा नाही
याबाबत मागील शुक्रवारी निविदेबाबतीची प्री बीड बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पेंग्विन कक्षाशेजारील जागा आंतरराष्ट्रीय मत्स्यालयाकरता पुरेशी नसल्याचे कंत्राटदारांनी निदर्शनास आणून दिली आहे. तसेच याठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता असून ही गर्दी नियंत्रणात आणणेही कठिण असल्याचेही त्यांनी या बैठकीत मांडण्यात आले.
तसेच राज्य सरकारच्याकडून वरळीतील मत्स्यालयाकरता महापालिकेला जमिन प्राप्त झाल्यानेही अखेर ही निविदा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे पेग्विन कक्षाच्या ठिकाणी छोट्या स्वरुपाचे टँक आणि सिलेंडरची व्यवस्था असेल अशाप्रकारची रचना होती, त्यासाठी निधीही कमी खर्च होणार होता. परंतु कंत्राटदारासाठी याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव बनवून निविदा काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तब्बल ४४ कोटींच्या निविदेचा प्रस्ताव या कामांसाठी तयार करण्यात आला होता. परंतु याबाबतची निविदा रद्द झाली असली तरी छोटया आकाराचे मत्स्यालय बनवण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community