मुंबई (सचिन धानजी)
मुंबईत (BMC News) रस्त्यांच्या कडेला अनधिकृत वाहने उभी केली जात असून या वाहनांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि अस्वच्छता निर्माण होते. अनेक रस्त्यांवर बेवारसपणे वाहने उभी केली जात असल्याने त्याठिकाणी योग्यप्रकारे स्वच्छता राखता येत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेने (BMC News) वाहतूक कोंडीच्या समस्येला आळा घालण्यासाठी व वाहनांची ये-जा आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रस्त्यावरील बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी शहर आणि उपनगरांसाठी प्रत्येकी संस्थांची निवड केली आहे. या संस्थांच्या माध्यमातून आता बेवारस वाहने नोटीस जारी केल्यानंतर ४८ तासांमध्ये उचलण्याची कार्यवाही केली जाणार असून या माध्यमातून मुंबईचे रस्ते स्वच्छ राखण्यासह महापालिकेच्या तिजोरीतही भर पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (BMC News)
हेही वाचा-‘Aaple Sarkar’ पोर्टल पाच दिवस बंद रहाणार, काय आहे कारण ?
गेल्या काही वर्षापासून मुंबईमध्ये वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दिवसभर वाहतूक वाह कोंडी, तसेच आपल्याला इच्छित स्थळी पोहोचण्यास होणारा विलंब, अपघात, ध्वनी व वायु प्रदूषण आदींचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जुन्या तथा बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या होती. या बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी स्क्रॅब यार्ड बनवण्यात येणार होते, परंतु याला शासनाने नामंजुरी देत याची विल्हेवाट शासनाच्या अनुसुचीवरील संस्थांकडून निविदा मागवून त्यांची निवड करावी अशाप्रकारची सूचना केली होती. त्यानुसार महापालिकेने मागवलेल्या निविदेत शहर आणि दोन्ही उपनगरांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत सुमारे पाच कोटींहून अधिक रक्कम जमा होणार असून यातील ५० टक्के रक्कम कार्यादेश दिल्यानंतर पहिल्या ३० दिवसांमध्ये आणि उर्वरीत ५० टक्के रक्कम पुढील सहा महिन्यांमध्ये महापालिकेला अदा करणे बंधनकारक आहे. (BMC News)
हेही वाचा- Ajit Pawar यांनी मंत्री कोकाटे यांना सुनावले खडेबोल !
महापालिकेच्या वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील सर्वात जास्त गाडयांची घनता ही मुंबईत असून ती १९०० गाड्या प्रति किमी इतकी आहे. ही घनता दिल्लीपेक्षा पाच पटीने जास्त आहे. रस्त्यावरील बेवारस वाहनांवर व धातूंचे स्क्रॅप, अनधिकृत बांधकाम साहित्य यावर कारवाई केल्यामुळे वाहतूकीची कोंडी दूर होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, तसेच महानगरपालिकेचे रस्ते स्वच्छ होऊन वाहतूकीकरीता बाधा येणार नाही. शिवाय यातून प्राप्त होणारे शुल्क महानगरपालिकेचा महसुल असेल. अनधिकृत बांधकाम साहित्याची विल्हेवाट कंत्राटदारामार्फत लावण्यात येईल. नोटीस कालावधीमध्ये वाहन मालकाने ते बेवारस वाहन रस्त्यावरुन काढणे अपेक्षित आहे. (BMC News)
शहर विभाग (BMC News)
कंत्राटदार संस्थेचे नाव : रझा स्ट्रील
एकूण कंत्राट बोली किंमत : १ कोटी ६० लाख १२ हजार ७८६ रुपये
कालावधी २४ महिने
पश्चिम उपनगरे (BMC News)
कंत्राटदार संस्थेचे नाव : प्रदीप ट्रेडींग
एकूण कंत्राट बोली किंमत : १ कोटी ५५ लाख रुपये
कालावधी २४ महिने
बेवासर वाहनांच्या विल्हेवाटीसाठी कंत्राटदारांची काय असेल जबाबदारी (BMC News)
- नोटीस कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच ४८ तासानंतर सदरहू बेवारस वाहन उचलणे कंत्राटदारास बंधनकारक राहील. याकरीता महानगरपालिका कंत्राटदारास कोणतेही अधिदान करणार नसून, कंत्राटदाराने मुंबई महानगर प्रदेश हद्दीतील त्याच्या जागेत ठेवणे बंधनकारक राहील. वाहन उचलल्यानंतर सदरहू जागेची स्वच्छता कंत्राटदारामार्फत करण्यात येईल.
- वाहन उचलल्यानंतर कंत्राटदाराने मुंबई महानगर प्रदेश हद्दीतील निश्चित केलेल्या जागी सुरक्षित ठेवण्याबाबतचा सर्व खर्च हा कंत्राटदाराने करणे बंधनकारक राहील.
- बेवारस वाहनांच्या निश्चितीकरीता सक्षम प्राधिकारी संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, रस्ते अभियंता, सहाय्यक अभियंता व विभाग कार्यकारी अभियंता तसेच वाहतूक विभागातील दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता व कार्यकारी अभियंता हे असतील.
- बेवारस वाहनांबाबत जर कायदेशीर किंवा विमासंबंधी प्रश्न उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कंत्राटदाराची असेल. तसेच बेवारस वाहनाची ने-आण करताना तसेच पार्किंगच्या जागेत असताना अपघात अथवा नुकसान झाल्यास त्याचीही जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असेल.
– वाहन उचलल्यानंतर व निश्चित केलेल्या जागी कंत्राटदारानं ठेवल्यानंतर त्या बेवारस वाहनाची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही कंत्राटदार त्यांच्या स्तरावर करणार आहे. तसेच प्रकारे उचललेल्या वाहनांचा तपशिल जसे की वाहन क्र., इंजिन क्र., चेसिस क्र. आदींची माहिती कंत्राटदाराने सर्व भागधारक प्राधिकारी म्हणजेच प्रादेशिक परिवहन विभाग, स्थानिक पोलीस ठाणे व विरिष्ठ पोलीस निरिक्षक (ऍन्टी मोटर व्हेईकल थेफ्ट) यांना त्वरित कळविणे बंधनकारक राहणार आहे.
- बेवारस वाहनाबाबत ४८ तासांमध्ये प्रतिसाद न दिल्यास ते वाहन टोविंग करून उचलून नेणे बंधनकारक असेल. या ४८ तासांमध्ये वाहन मालकाने मालकाने प्रतिसाद दिल्यास दंड आकारण्यात येईल.
- या दंडाच्या ५० टक्के रक्कम ही महानगरपालिकेला तर ऊर्वरित ५०टक्के रक्कम ही कंत्राटदारास टोईंग आणि पार्किंगकरता अदा केले जातील. नोटीसचा ४८ तासांचा कालावधी संपल्यानंतर न उचलल्यास कंत्राटदारास प्रत्येक दिवशी.२००० रुपये याप्रमाणे दंड लागू केला जाईल.
– अशा बेवारस वाहनांना सक्षम प्राधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने त्या जागी नोटीस लावण्यात येईल किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरुपात वाहन मालकास नोटीस पाठविण्यात येईल. त्यानंतर वाहनास नोटीस जारी केल्याचा तपशिल जसे फोटो ज्यामध्ये भौगोलिक स्थान (जिओ लोकेशन), रस्त्याचे नाव, दिनांक व वेळ इत्यादी असलेला अभिलेख (रेकॉर्ड) तयार करण्यात येईल.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community