अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पुलाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. परंतु या पुलाचे संरचनात्मक लेखा परिक्षण करण्यात आल्यानंतर सल्लागारांच्या सल्ल्यानुसार हे जीर्ण पूल सोमवार ७ नोव्हेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या वाहतुकीसाठी विविध पर्यायी रस्ते उपलब्ध पुलाचे काम अत्यंत प्राधान्याने हाती घेण्यात आले असून मे २०२३ पर्यंत २ मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येतील. तर उर्वरित २ मार्गिका सप्टेंबर २०२३ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येतील,असे महापालिका अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली आहे.
( हेही वाचा : राहूल द्रविडसह, विराट-रोहितने सोडल्या बिझनेस क्लासच्या सीट्स; कारण वाचून तुम्ही सुद्धा कराल कौतुक)
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पुलाच्या संकल्पना आराखड्यावर आयआयटी मुंबई यांनी अत्यंत प्राधान्याने कार्यवाही करुन आठवडाभराच्या आत संकल्पना निश्चित करावी, यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष विनंती करण्यात आली आहे. ही विनंती आयआयटी मुंबईने मान्य केली आहे. दरम्यान, गोखले पूल बंद झाल्यानंतर उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गांवर वाहतूक सुरळीत होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने वाहतूक पोलिस, एमएमआरडीए आदींच्या सहाय्याने तातडीने उपाययोजना पूर्ण कराव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले आहेत.
पूल बंद झाल्यानंतर पर्यायी मार्ग व वाहतुकीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेट देऊन पूल परिसराची पाहणी केली. उपायुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, के/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, के/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहाण, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडिण्यपुरे आणि इतर संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद मार्गावर मेट्रो प्रकल्पाची विविध कामे सुरु आहेत. या कामांसाठी लावलेले संरक्षक कठडे (बॅरिकेड्स) अरुंद करावेत. जेणेकरुन, वाहतुकीला अधिक जागा उपलब्ध होईल, अशी विनंती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांना करण्यात आली आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्तांनी ही विनंती मान्य केली असल्याचे वेलरासू यांनी सांगितले.
वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गांवरील फेरीवाले आणि अतिक्रमण २ दिवसांच्या आत हटविण्याचे निर्देश उपायुक्त (परिमंडळ ४) यांना त्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे पर्यायी मार्गांवर अनधिकृतरित्या वाहने उभी राहणार नाहीत, याची सुनिश्चिती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. पर्यायी मार्गांवर वाहतूक सुलभरित्या सुरु रहावी, यासाठी रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी तातडीने पुनर्पृष्ठीकरण करावे, हे काम रात्री करावे, जेणेकरुन वाहतुकीला बाधा पोहोचणार नाही, असे निर्देश त्यांनी दोन्ही सहायक आयुक्तांना दिले आहेत.
गोखले रेल्वे पुलाचा संकल्पना आराखडा (डिझाईन) आयआयटी मुंबई यांच्याकडे फेर तपासणीसाठी देण्यात आला आहे. या संकल्पनेवर तातडीने कार्यवाही करुन त्यास अंतिम रुप देण्याची विनंती मुंबई महानगरपालिकेने आयआयटी मुंबई यांच्याशी संपर्क साधून केली आहे. या संकल्पना आठवड्याच्या आत अंतिम करण्याचे आयआयटी मुंबईने मान्य केले आहे. अंतिम मंजुरीसह संकल्पना प्राप्त होताच त्यापुढील प्रशासकीय कार्यवाही महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत तातडीने हाती घेण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.
या पुलाचे काम अत्यंत प्राधान्याने हाती घेण्यात आले असून मे २०२३ पर्यंत २ मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येतील. तर उर्वरित २ मार्गिका सप्टेंबर २०२३ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येतील. दरम्यान, या परिसरातील वाहतुकीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या पर्यायी मार्गांवर मुंबई महानगरपालिकेतर्फे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच या पर्यायी मार्गांवरील वाहतूक सुरळीत राहील, याचीही काळजी घेतली जात आहे. त्यादृष्टीने वाहतूक पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त २०० मनुष्यबळ नेमण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community