-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेचे नवनियुक्त सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांनी एफ उत्तर विभागात नियुक्ती झाल्यानंतर येथील फुलविक्रेत्यांच्या अतिक्रमित आणि अनधिकृत गाळ्यांवर कारवाई केली. तसेच लालबहादूर शास्त्री मार्ग व भांडारकर मार्गावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून सिंघम बनण्याचा प्रयत्न केला. परंतु ही कारवाईच आता शुक्ला यांच्या अंगलट आली असून सेवेच्या प्रारंभीच परवानाधारक गाळ्यांवर केलेल्या कारवाईमुळे वादात अडकलेल्या शुक्ला यांची लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे चक्क दीड महिन्यात बदली करावी लागली आहे. भाजपा आमदाराच्या मागणीमुळे ही बदली झाली असली तरी प्रत्यक्षात या विभागाला चांगला अधिकार लाभलेला असताना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अशा अधिकाऱ्याची बदली झाल्याने तीव्र नाराजीही व्यक्त केली जात आहे. (BMC)
(हेही वाचा – Coastal Road वर यांत्रिक झाडूद्वारे होणार सफाई)
मुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी यांनी महापालिका प्रशासनातील खांदेपालट करताना काही सहआयुक्त तथा उपायुक्तांच्या बदल्या करताना सहायक आयुक्तांच्या बढत्या आणि सहायक आयुक्तांच्या बदल्या तसेच नवनियुक्त सहायक आयुक्त्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये दीड महिन्यांपूर्वी एफ उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त पदी नियुक्ती केलेल्या नवनियुक्त नितीन शुक्ला यांची बी विभागात केली आहे. नितीन शुक्ला यांनी पहिल्या दीड महिन्यांतच आपली चमक दाखवून एकप्रकारे खैरनार स्टाईलने कारवाई केली होती. त्यामुळे काही जण आनंदी झाले होते, तर काही जणांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. हे प्रकरण एवढे मोठे झाले तरी शीव कोळीवाडा मतदारसंघाचे आमदार तमिल सेल्वन यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर शुक्ला यांच्या बदलीसाठी जोरदार प्रयत्न सुरु होते. परंतु आयुक्तांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची खांदेपालट करताना शुक्ला यांची बदली बी विभागात करून त्यांना एकप्रकारे आता आपली मर्दुमकी अनधिकृत बांधकामांचे माहेरघर असलेल्या बी विभागात जाऊन दाखवा असाच संदेश दिला आहे. त्यामुळे शुक्ला आता बी विभागात कशी कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. (BMC)
(हेही वाचा – Hindu Rashtra च्या स्थापनेसाठी देशभरात २० हजारांहून अधिक भाविकांकडून ‘सामूहिक हनुमान चालीसा पठण’ !)
विशेष म्हणजे प्रथमच एफ उत्तर विभागाला धाडसी अधिकारी मिळाला होता. परंतु त्यांची दीड महिन्यात बदली झाल्याने एकप्रकारे तीव्र नाराजी रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. भाजपाच्या दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनीही शुक्ला यांच्या बदलीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शीव कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे मोठ्याप्रमाणात होत असून त्यावर कारवाई करण्यासाठी शुक्ला यांच्या रुपात धाडसी अधिकारी मिळाले होते. परंतु त्यांची बदली झाल्यानंतर विभागातील रहिवाशी तसेच सोसायट्यांकडून मला निवेदन प्राप्त होत असून ही निवेदन आयुक्तांना सादर केली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community