कोविडनंतर पुन्हा एकदा महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा भव्य दिव्य टॅलेंट शो होणार असून मागील कार्यक्रमापेक्षा हा शो भव्य व दिव्य करण्याचा निर्णय महापालिका शिक्षण विभागाने घेतला आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा वरळी एनएससीआई डोम येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर लवकरच होणार आहे. इंद्रधनुष्य महापालिका टॅलेंट शो नावाने कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळत आहे.
या इंद्रधनुष्य महापालिका टॅलेंट शोमध्ये महापालिका शाळातील सुमारे १८०० विद्यार्थी सहभागी होणार असून कार्यक्रमाला ४०० शिक्षक, मदतनीस व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार, आमदार, महापालिकेचे अधिकारी आमंत्रित असतील. या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या अती महत्वाच्या व्यक्ती, महापालिका अधिकारी तसेच कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या अन्य व्यक्तींची सुरक्षा, बैठक व्यवस्था व इतर सोय होण्याच्या दृष्टीकोनातून या क्षेत्रात काम करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.
(हेही वाचा – बोरीवली कोरा केंद्रामागील ‘तो’ भूखंड झाला अतिक्रमण मुक्त)
महापालिकेच्या शिक्षण खात्यांतर्गत शालेय विद्यार्थ्यांकरता दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धा, शिबिरे, स्वसंरक्षण प्रशिक्षण, आर एस पी इत्यादी उपक्रम आयोजित केले जातात. या सर्व उपक्रमात महापालिका विद्यार्थी सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त करतात. आजवर अशाप्रकारचे उपक्रम शालेय स्तरावरच आयोजित केले जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि कला गुणांचा प्रचार आणि प्रसार मर्यादीत असतो. परंतु विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अधिकाधिक प्रसार होऊन विविध स्तरावरील उपक्रमात महापालिका विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी हा टॅलेंट शो आयोजित करण्यात येत असून यंदा हा शो भव्य दिव्य करण्यासाठी याचे नाव इंद्रधनुष्य महापालिका टॅलेंट शो असेही करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community