मुंबईकरांचा ऑक्सिजन पॉवरफुल… तिस-या लाटेसाठी अशी आहे महापालिकेची तयारी

पहिल्या दोन लाटांच्या अनुभवातून परिपक्व झालेली मुंबई महापालिका आता तिसऱ्या लाटेला अगदी सहजपणे सामोरी जाऊ शकते.

132

मुंबईत संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात येत असला, तरी मुंबईतील ऑक्सिजनची पातळी सुस्थितीत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये संपूर्ण मुंबईत कोविडबाधित रुग्णांवर उपाययोजना करताना २३५ मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज भासत होती. परंतु हा सर्व ऑक्सिजनचा साठा बाहेरुन आणावा लागत होता. पण आता तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना मुंबईतील एकूण क्षमतेच्या ५० टक्के ऑक्सिजनची क्षमता मुंबईत आहे. महापालिकेच्यावतीने ७७ ठिकाणी सुरू करण्यात आलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि दोन ठिकाणी असलेली रिफिलिंग सेंटर व साठवणूक केंद्र आदींच्या माध्यमातून एकूण वापराच्या ५० टक्के ऑक्सिजनची गरज मुंबई महापालिकाच पूर्ण करू शकणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन लाटांच्या अनुभवातून परिपक्व झालेली मुंबई महापालिका आता तिसऱ्या लाटेला अगदी सहजपणे सामोरी जाऊ शकते.

जंबो कोविड सेंटर सज्ज

महापालिकेच्यावतीने रुग्णालये आणि जंबो कोविड सेंटरमध्ये कोविडबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असले, तरी तिसऱ्या लाटेपूर्वी आता त्यात आणखी चार केंद्रांची भर पडत आहे. महालक्ष्मी, शीव-चुनाभट्टी, मालाड आणि कांजूरमार्ग आदी चार ठिकाणी नव्याने जंबो कोविड सेंटर सुरू होत आहेत. यातील मालाड आणि कांजूरचे काम पूर्णत्वास आलेले आहे. तर उर्वरित दोन जंबो कोविड सेंटरचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.

(हेही वाचाः अखेर भायखळ्यातील रिचर्डसन अँड क्रुडासमध्ये उभारणार पाच ऑक्सिजन प्लांट)

महापालिकेचे नियोजन

मागील काळात मुंबईला एकूण २३५ मेट्रीक टन एवढ्या ऑक्सिजन प्लांटची गरज होती. परंतु महापालिकेने प्रत्येक रुग्णालय आणि कोविड सेंटरची माहिती घेऊन त्यातील प्रत्यक्षात ऑक्सिजन बेडचा वापर किती होतो, त्यानुसार वापराच्या २० ते ३० टक्के अधिक अशाप्रकारे वापर गृहीत धरुन ऑक्सिजन वापराचे नियोजन केले. त्यामुळे यापूर्वीची गरज २३५ मेट्रीक टनची असली तरी मुंबईत याचा वापर २००च्या वर कधीच गेला नाही. उलट ऑक्सिजन वापराची बचत महापालिकेने योग्य नियोजनामुळे केली, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.

ऑक्सिजनची गरज भागवणार

पूर्वी बाहेरुन येणाऱ्या ऑक्सिजनची वाट पाहावी लागायची. परंतु आता महापालिकेच्यावतीने उपनगरीय रुग्णालये आणि जंबो कोविड सेंटरमध्ये ७७ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मध्यवर्ती यंत्रणेमार्फत पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा प्रत्येक खाटांना जोडला गेला आहे. त्यामुळे ही योजना कायमस्वरुपी असून खूपच गरज लागली, तरी ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करण्याचीही तरतूद करुन ठेवण्यात आली आहे. त्याामुळे ऑक्सिजन अभावी कुठेही रुग्णांची परवड होणार नाही किंवा त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागणार नाही, असा विश्वास काकाणी यांनी व्यक्त केला आहे. या मध्यवर्ती प्रणालीच्या वापरामुळे ऑक्सिजन वापरातही मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, गणेशोत्सव सुरू झाल्याने प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी. कुठेही हा आजार वाढेल असे वागू नये. दिलेल्या त्रिसुत्रीचे पालन करा, असेही आवाहन काकाणी यांनी मुंबईकर जनतेला आणि भाविकांना केले आहे.

(हेही वाचाः 31 हजार खड्डे बुजवले, तरी मुंबईकरांचे पाय खड्ड्यातच अडकले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.