येत्या १५ दिवसांत आरोग्य विभागाच्या १३ वास्तूंचे लोकार्पण आणि भूमिपूजन

130

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेला करून दाखवले म्हणणे सार्थ ठरावे म्हणून प्रशासनाकडून रुग्णालयांच्या कामांवर शेवटचा हात फिरवण्यास सुरुवात केली जात आहे, तर काही ठिकाणी भूमिपूजनाचे श्रीफळ वाढवण्याची तयारी सुरु झाली आहे. यामध्ये महापालिका रुग्णालयांच्या इमारती आणि पीएनजीवर आधारीत स्मशानभूमींचे लोकार्पण केले जाणार आहे. तर विविध रुग्णालयांच्या इमारतींचे भूमिपूजन अशाप्रकारे एकूण १३ इमारतींचे लोकार्पण व भूमिपूजनाचे कार्यक्रम आटोपून घेतला जाणार आहे.

पालिकेकडून नव्या इमारतीचे बांधकाम सुरु

मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या ४९० खाटांचे बोरीवली हरिलाल भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे बांधकाम, तसेच मुलुंडमधील ४७० खाटांचे एम.टी. अग्रवाल रुग्णालयाचा पुनर्विकास, ५८० खाटांचे गोवंडीतील पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालयाचे बांधकाम, वांद्रे भाभा रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचे बांधकाम, दादर येथील जाखादेवी मल्टीस्पेशालिटी क्लिनिकच्या नवीन इमारतीचे बांधकाम, नायर दंत महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा विस्तार, शीव रुग्णालयातील नर्सिंग कॉलेज, कर्मचारी निवासस्थान आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाचे नवीन बांधकाम, ऍक्वर्थ रुग्णालयाच्या आवारात केईएमच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सध्या सुरु आहेत.

(हेही वाचा – पीएनजीच्या स्मशानभूमीकडे लोकांची पाठ, पर्यावरणपूरक लाकडी चिता उभारणार!)

शीव रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण होण्याचा कालावधी ५ वर्षांचा होता, परतु आता हे काम ३ वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे. कोविड महामारीच्या काळातही कूपर रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे नवीन बांधकामही नियोजित वेळेपूर्वी पूर्ण होत आहे, असे महापालिकेच्या आरोग्य पायाभूत सेवा सुविधा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भूमिपूजन करण्यात येणारी कामे

  • कांदिवलीतील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या आवारातील नवीन सुपरस्पेशालिटी रुग्णालय
  • नायर रुग्णालयातील इमारतीचे बांधकाम
  • भांडुप नाहुर गाव येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम
  • कामाठी पुरा येथील नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास
  • सिध्दार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास
  • शीव रुग्णालयाचा दुसऱ्या टप्यातील पुनर्विकास
  • क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचा पुनर्विकास
  • ओशिवरा प्रसुतीगृह
  • राजावाडी रुग्णालयाच्या अत्यावश्यक विभागाची इमारत

या वास्तूंचे होणार लोकार्पण

  • बोरीवली राम मंदिर रोडवरील पीएनजीवर आधारीत स्मशानभूमींचे लोकार्पण
  • डॉ.आर.एन. कूपर रुग्णालयाच्या आवाराततील हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब वैद्यकीय महाविद्यालय
  • नायर रुग्णालयातील डेंटल कॉलेजची विस्तारीत इमारत
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.