सोसायटी आणि मोकळ्या जागांवर झाडे कुठे लावायची, महापालिका तयार करते कृती आराखडा

व्यक्तिगत पातळीवर नागरिकांनी, गृहनिर्माण संस्थांनी तसेच लहानसहान जागांवरही वृक्षारोपण, हरितीकरण करणे, प्रायोगिक तत्त्वांवर वेगवेगळे हरित उपक्रम राबवणे, नागरिक / संस्था यांनी वृक्ष दत्तक घेणे, यासारख्या अनेक संकल्पनांसाठी आता हरितीकरणाबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा विचार केला जात असून यंदाच्या पावसाळ्यापूर्वी मुंबई हरितीकरणाची मार्गदर्शक तत्वे आणि कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मुंबई महानगरात पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येतात. अलीकडे नागरी वनांच्या माध्यमातून तब्बल ५ लाखांवर झाडांची लागवड करण्याचा अभिनव उपक्रम देखील यशस्वी झाला आहे. मुंबईच्या हरितीकरणाला आता गृहनिर्माण संस्था व व्यक्ती स्तरापर्यंत नेवून त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने वेग देण्यासाठी हरितीकरणाची मार्गदर्शक तत्त्वे आखली जाणार आहेत. त्यासाठी बुधवार दिनांक ८ मार्च २०२३ रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई हरित क्षेत्रामध्ये वाढ व्हावी, त्याची अधिकाधिक चांगली जपणूक व्हावी, मुंबईचे पर्यावरण समृद्ध व्हावे या उद्देशाने महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. मुंबईतील उद्याने, मोकळ्या जागांवरील वृक्षारोपण, रस्ते दुभाजकांवर हरित पट्टे, अलीकडे मुंबईभर मिळून सुमारे साडेचार लाखांपेक्षा अधिक वृक्षलागवड झालेली नागरी वने, तसेच नव्याने करण्यात येत असलेली १ लाख वृक्ष लागवड अशा निरनिराळ्या उपक्रमांमधून मुंबईच्या हरितीकरणाला चालना देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना गृहनिर्माण संस्था व नागरिकांकडून व्यक्तिगत स्तरावरुन सहभाग मिळावा, यासाठी आता मार्गदर्शक धोरण आखण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने, वर्ल्ड रिसोर्सेस इंडिया या संस्थेच्या सहकार्याने डिसेंबर २०२२ मध्ये भागधारक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये झालेल्या विचार विनिमयानुसार मुंबई महानगराला लोकसहभागातून हिरवेगार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. मुंबईत यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने हरितीकरण / हिरवळ राखण्यासाठी सूक्ष्म मार्गदर्शक तत्त्वे (मायक्रो-ग्रीनिंग गाईडलाईन्स) तयार करण्यात येणार आहेत. ही मार्गदर्शक तत्वे हस्तपुस्तकाद्वारे (हँडबुक) प्रसिद्ध करण्यात येतील. हा उपक्रम बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उद्यान विभाग आणि वर्ल्ड रिसोर्सेस इंडिया यांच्याद्वारे संयुक्तपणे राबविला जाणार आहे. या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे वैयक्तिक स्तरावर घर, गृहनिर्माण संस्थांच्या अखत्यारितील जागा व शहरातील लहान भूखंडांमध्ये हरित क्षेत्र वाढवण्यासाठी संकल्पना आणि पद्धती यांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सबब, मुंबई महानगराला पर्यावरण सक्षम बनविणे व जैवविविधता वाढविण्यासाठी हरितीकरणाची कामे खोलवर रुजवणे आवश्यक असल्याचे लक्षात घेवून, बुधवार, दिनांक ८ मार्च २०२३ रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन प्रदर्शनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर स्थित सभागृहात दुपारी तीन ते साडेपाच या वेळेत हे चर्चासत्र होणार आहे. त्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी, हरितकरण क्षेत्रातील तज्ज्ञ, दाते, संसाधन व्यक्ती, पर्यावरण तज्ज्ञ, बिगर शासकीय संस्थांचे प्रतिनिधी आदी सहभागी होणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here