गणेशोत्सव मंडळांना या पुस्तिकेची माहिती आहे का?

यंदाचा गणेशोत्सव देखील कोविड साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने, या अनुषंगाने घ्यावयाच्या काळजीबाबत महत्त्वाची व जनजागृतीपर माहिती या पुस्तिकेत समाविष्ट आहे.

76

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आणि गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पूरक माहिती देणारी पुस्तिका मुंबई महापालिकेच्या वतीने जनसंपर्क विभागाद्वारे दरवर्षी प्रकाशित करण्यात येते. त्यानुसार यंदा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे. ही माहिती पुस्तिका सर्व गणेशोत्सव मंडळांसाठी मार्गदर्शक असून, महापालिकेच्या संकेतस्तळावर ही पुस्तिका येत्या सोमवारपासून म्हणजेच 6 सप्टेंबरपासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्‍या जनसंपर्क विभागातर्फे ‘श्री गणेशोत्सव– २०२१ माहिती पुस्तिका’चे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवार ४ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबई महापालिकेच्‍या बाई. य. ल. नायर रुग्‍णालय शतकपूर्ती सोहळ्याप्रसंगी करण्यात आले.

(हेही वाचाः देव मंदिरातच नाही, तर रुग्णालयातही! मुख्यमंत्र्यांनी कुणाला सुनावले?)

ही माहिती मिळेल

यंदाच्या गणेशोत्सव माहिती पुस्तिकेत सर्वसाधारण माहिती, मंडप परवानगी अर्जाचा नमुना, सर्वसमावेशक सुधारित मार्गदर्शक सूचना, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने गणेशोत्सव २०२१ संदर्भात निर्गमित केलेले परिपत्रक, महापालिकेच्या उद्यान खात्याचे परिपत्रक, गणेशोत्सवात जाहिराती प्रदर्शित करण्याबाबतचे निकष, महापालिकेचे व इतर महत्त्वाचे नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, नैसर्गिक विसर्जन स्थळांचा विभागवार नकाशा, कृत्रिम विसर्जन तलावांची विभागवार यादी, सण आणि समारंभांसाठी रस्त्यांवर तात्पुरते बांधकाम उभारण्यास परवानगी देण्याबाबतच्या धोरणातील महत्त्वाच्या तरतुदी, मूर्ती विसर्जनच्या दिवशी समुद्राला असलेल्या भरती व ओहोटीच्या वेळा, लाटांची उंची इत्यादी माहितीचा समावेश या पुस्तिकेत आहे.

इथे मिळणार पुस्तिका

त्याचबरोबर गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाचा गणेशोत्सव देखील कोविड साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने, या अनुषंगाने घ्यावयाच्या काळजीबाबत महत्त्वाची व जनजागृतीपर माहिती या पुस्तिकेत समाविष्ट आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या कोविड विषयक नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक देखील या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. ही पुस्तिका महापालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in किंवा http://portal.mcgm.gov.in यावरही उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

(हेही वाचाः हाजीअलीत कचऱ्यापासून होणार वीज निर्मिती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.