मुंबई महापालिकेत माहिती व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने खरेदी करण्यात येणाऱ्या संगणक खरेदीसंदर्भात आरोप केल्यानंतर हे सर्व संगणक विभाग तथा खात्यांच्या वतीने वतीने आवश्यतेनुसार खरेदी करण्याची शिफारस तत्कालीन सहआयुक्त दक्षता यांनी आपल्या अहवालात नोंदवल्यानंतरही पुन्हा एकदा माहिती व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने तब्बल दोन हजार संगणकांची खरेदी केली जात आहे. विशेष म्हणजे मागील खरेदीच्यावेळी प्रती संगणक देखभाल व दुरुस्तीसह ८५ हजारांची बोली लावली होती, परंतु यावेळी करण्यात येणारी खरेदीमध्ये प्रती संगणकासाठी ३४ हजार रुपये मोजले जाणार आहे.
केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या ई गव्हर्नन्स धोरणानुसार महापालिकेत विविध ई-गव्हर्नन्स प्रकल्प राबवण्यात येत असून त्यामध्ये संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ई गव्हर्नन्स प्रकल्पांमध्ये नवीन तंत्रज्ञान व नव कल्पना यांचा वापर करून कामकाजात वापर करण्यासाठी महापालिकेने आयटी व्हिजन २०२५ जाहिर केले आहे. त्यामुळे विविध विभाग, कार्यालये यांची संगणक मागणी पूर्ण करण्यासाठी २ हजार खरेदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने निविदा राबवली आहे.
(हेही वाचा –Kojagiri Purnima: गप्पा, गाणी आणि हास्यजत्रेतील कलाकारांसह रसिकांनी लुटला कोजागिरीचा आनंद )
या निविदेमध्ये विविध करांसह ८ कोटी ०८ लाख ३० हजार रुपये खर्च केले जाणार असून यासाठी मेसर्स इनमॅक कम्प्युटर्स या कंपनीची नेमणूक करण्यात आली. तीन वर्षांच्या हमी कालावधीसह या संगणकांची खरेदी केली जाणार आहे. या साठी प्रति संगणक ३४ हजार २५० रुपये खर्च केले जाणार आहे.
महापालिकेच्या विविध विभाग तसेच कार्यालयांना देण्यात आलेल्या संगणकांपैकी बरेच संगणक ५ वर्षापेक्षा जुने व कालबाह्य झाल्याने महापालिकेने विभागांच्या मागणीनुसार ३ हजार नवीन संगणक खरेदी करण्याचा निर्णय सप्टेंबर २०२२मध्ये घेतला होता. त्यानुसार मागवलेल्या निविदेमध्ये महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा एक टक्के अधिक दराने बोली लावत डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्यूशन्स लिमिटेड ही कंपनीने काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पात्र ठरलेल्या या कंपनीकडून प्रति संगणक ८५ हजार ९०४ रुपये दराने एकूण २५ कोटी ४१ लाख रुपये किंमतीत तीन हजार संगणकांची खरेदी केली जाणार होती. त्यामुळे ५० ते ६० हजार रुपयांमध्ये उपलब्ध होणाऱ्या संगणकांची किंमत ८५ हजारांमध्ये खरेदी केल्याने याबाबत सर्वांचाच भुवया उंचावल्या गेल्या होत्या.
हे संगणक खरेदी तीन वर्षांच्या हमी कालावधीसह त्यात वार्षिक देखभालीच्या कंत्राटाचाही समावेश होता, त्यामुळे त्याची किंमत अधिक होती. महापालिकेच्या विविध विभाग आणि कार्यालयांकडून ९ हजार संगणकांची मागणी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे होती, परंतु या विभागाने केवळ ३ हजार संगणकांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता .या संगणक खरेदीच्या किंमतीबाबत भाजपचे महापालिकेतील माजी पक्षनेते विनोद मिश्रा यांनी यांनी आक्षेप नोंदवला होता,त्यानंतर ही निविदा प्रक्रिया रद्द करून याची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती, या समितीने प्रत्येक विभागाने आपल्या मागणीनुसार विभाग तथा कार्यालयाच्या स्तरावर संगणकाची खरेदी करण्याची शिफारस केली होती. पण असे असतानाही माहिती व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने दोन हजार संगणकांची खरेदी केली जात असून तीन वर्षांच्या हमी कालावधीसह प्रती संगणक ३४ रुपयांमध्ये याची खरेदी केली जात आहे.