कचरा पेट्या मुक्ततेकडून पुन्हा कचरा पेट्यांकडे : सुमारे १६०० कचरा पेट्यांची खरेदी

116

मुंबईतील कचऱ्याचे अनेक डबे सध्या नादुरुस्त अवस्थेत असून पत्र्याचे सर्व कचऱ्याचे डबे नव्याने खरेदी केले जात आहेत. मुंबईत यासाठी सुमारे १६०० पत्र्यांचे कचरा पेट्यांची खरेदी केली जात आहे. सुमारे ६५ हजार  रुपयांमध्ये या कचरा पेट्या खरेदी केल्या जाणार आहे. कचरा पेट्यामुक्तचे स्वप्न मुंबईत शक्य नसल्याने पुन्हा एकदा कचरा पेट्या सार्वजनिक ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी ठेवल्या जाणार आहेत.

मुंबईत दरदिवशी सरासरी ६ हजार मेट्रीक टन कचरा निर्माण होत असून दैनंदिन निर्माण होणारा कचरा हा सुमारे तीन हजार सार्वजनिक कचरा पेट्यांसह इतर कचरा पेट्यांमध्ये जमा टाकला जातो. या कचरा पेट्यांमधील कचरा हा कचरा हस्तांतरण केंद्रांमध्ये वाहून नेला जातो. मुंबईत विविध ठिकाणी कचरा संकलनासाठी असलेल्या सार्वजनिक कचरा पेट्यांचे प्रमाण कमी करयाचा प्रयत्न तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या काळात झाला होता. परंतु सार्वजनिक ठिकाणच्या कचरा पेट्यांचे प्रमाण कमी करण्यात आल्यानंतर नागरिकांकडून खुल्या जागेवर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले नाही. उलट या कचऱ्यामुळे अनेक ठिकाणी खुल्या जागांवर अस्वच्छता आणि दुर्गंधी निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी कचरा पेट्यांचे प्रमाण वाढवण्याचा निर्णय घेतला.

मुंबईत एक मीटर क्षमतेच्या सुमारे ३ हजार सार्वजनिक कचरा पेट्या असून  गजबजलेली ठिकाणे,भाजी मंडई, बाजार पेठ स्थानकाजवळील परिसर आदी विविध प्रभागामध्ये जेथे जास्त प्रमाणात व वारंवार कचरा निर्माण होतो, तिथे या कचरा पेट्या ठेवण्यात येतात. दैनंदिन तात्पुरत्या स्वरुपात साठवण्यासाठी तसेच कचऱ्याच्या एक मीटर क्षमतेचे पत्र्याचे डबे ठेवण्यात आले होते. यातील अनेक मोठ्या कचरा पेट्या नादुरुस्त झाल्याने या कचरा पेट्यांचे प्रमाण कमी होईल आणि कचरा पेट्या मुक्त मंबई होईल असे बोलले जात होते.

परंतु प्रशासनाने कचरापेट्यांची आवश्यकता लक्षात घेता नादुरस्त झालेल्या कचरा पेट्यांच्या जागी नवीन पत्र्याच्या एक मीटर क्षमतेच्या १६०० कचरा पेट्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये मॅक इनव्हायरोटेक अँड सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही पात्र ठरली असून या एका कचरा पेटीसाठी  ६३ हजार ६०० रुपयांचा दर आकारला जाणार आहे. त्यामुळे या १६०० कचरा पेट्यांसाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासर्व कचरा पेट्यांचा पुरवठा वर्षभरात केला जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या कचरा पेट्यांचा पुरवठा २४ विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या विभागीय सहायक अभियंता यांच्या निर्देशानुसार पुरवठा केला जाईल,असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.