- सचिन धानजी,मुंबई
मुंबईतील रस्ते पाण्याने धुण्याचे काम महापालिकेच्यावतीने (BMC) हाती घेण्यात आले असून या मध्ये रस्ते दुभाजक व रस्ते साफ करणारी मशिन्स खरेदी करण्यात येत आहेत. यासाठी उच्च क्षमतेचे वॉशिंग आणि व्हॅक्यूम सुविधांसह असलेली सात वाहने खरेदी करण्यात आली आहे. या सात वाहनांसाठी विविध करांसह २७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. परंतु या वाहनांच्या खरेदी करता २७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात पुढील आठ वर्षांच्या देखभालीसाठी तब्बल ७४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी या ७ वाहनांच्या देखभालीवर तब्बल सव्वा नऊ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. तर एका वाहनाच्या देखभालीवरच १ कोटी ३२ लाख रुपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील वायू प्रदुषण नियंत्रण आणि सार्वजनिक स्वच्छता सुधारण्यासाठी महापालिकेच्यावतीने (BMC) सखोल स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेकरता अत्याधुनिक यंत्राचा उपयोग केला जात असून त्या आधारे मुंबई शहर आणि उपनगरांतील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्ते हे पाण्याने धुण्याचे काम महापालिकेच्यावतीने केले जात आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने उच्च क्षमतेचे वॉशिंग आणि व्हॅक्यूम सुविधांसह रस्ते व दुभाजक साफ करणारी वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे सात वाहने खरेदी करण्यात येत असून त्यांच्या पुढील आठ वर्षांच्या देखभालीसाठी कंत्राटदारवर जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेत यासाठी निविदा मागवली होती.
(हेही वाचा – Paris Olympics 2024: राज्य शासनाकडून ऑलिंपिकवीर Swapnil Kusale ला एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर)
त्या निविदेमध्ये आर्यन पंप्स अँड एन्व्हायरो सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीने एक वर्षांच्या हमी कालावधीसह सात वाहनांसाठी २७.८५ कोटी रुपये आणि पुढील आठ वर्षांच्या देखभालीच्या कालावधीसाठी ७५ कोटी ३० लाख रुपये अशाप्रकारे एकूण १०३.२६ कोटी रुपयांचे बोली लावून काम मिळवले आहे. ही वाहने पुढील आठ महिन्यांमध्ये महापालिकेच्या (BMC) ताफ्यात येणे अपेक्षित आहे. त्यामुळे पहिल्या एक वर्षांच्या हमी कालावधीसह पुढील आठ वर्षांच्या कालावधीतील देखभाल आणि दुरुस्ती संबंधित कंपनीमार्फत केली जाणार आहे.
यासाठी ०३मे २०२४पर्यंत निविदा मागवली होती आणि २२ मार्च २०२४ रोजी या निविदेची प्रि बीड मिटींग घेण्यात आली होती. मात्र, यामध्ये केवळ दोन कंपन्यांनीच भाग घेतला. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या निविदा खुल्या करण्यात आल्या नंतर निविदेतील अटी व शर्तीनुसार, गुणवत्ता आणि मुल्य आधारित निवडीवर आधारित निकषानुसार मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अप्रतिसादात्मक ठरली. त्यामुळे आर्यन पंप्स ही एकमेव कंपनी स्पर्धेत राहिली. त्यामुळे जुन महिन्यात याची निविदा खुली करण्यात आली. विशेष म्हणजे स्पर्धात्मक निविदासाठी तीन निविदाकारांची आवश्यकता होती. असे असतानाही दोन कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या निविदा खुल्या करून त्यातील एक कंपनी अप्रतिसादात्मक ठरली. त्यामुळे या कामासाठी मागवलेल्या निविदेवर शंका उपस्थित होत आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community