मुंबईला लस साठा प्राप्त, आजपासून लसीकरण सुरु!

बृहन्मुंबई महानगरपालिकेला सोमवारी १ लाख ५ हजार कोविड प्रतिबंधक लसींचा साठा प्राप्त झाला आहे. यामुळे गुरूवार दिनांक ५ ऑगस्ट २०२१ पासून कोविड लसीकरण मोहीम पुनश्च सुरु होणार आहे.

महानगरपालिकेला लस साठ्यामध्ये कोविशिल्डचे ५७ हजार, तर कोवॅक्सिनचे ४८ हजार डोस प्राप्त झाले आहेत.

270 केंद्रांवर वॉक इन लसीकरण

दरम्यान, मुंबईत शासकीय आणि महानगरपालिका मिळून एकूण ३१४ लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. यापैकी मुंबईतील २२७ निवडणूक प्रभागांमध्ये मिळून असलेल्या एकूण २७० लसीकरण केंद्रांवर आता १८ वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांना थेट जाऊन (वॉक इन) लस घेता येईल.

गर्भवती महिला, विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, विदेशात नोकरी / व्यवसायासाठी जाणारे नागरिक यांना मात्र त्यांच्यासाठी निर्देशित केलेल्या लसीकरण केंद्रावरच लस देण्यात येईल. २२७ निवडणूक प्रभागांमधील लसीकरण केंद्र वगळता इतर सर्व म्हणजे शासकीय व महानगरपालिका रुग्णालये आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर प्रचलित पद्धतीप्रमाणेच म्हणजे ५० टक्के नोंदणी आणि ५० टक्के थेट येणाऱ्यांना (वॉक इन) लसीकरण याप्रमाणे कार्यवाही सुरू राहणार आहे.

तसेच, सर्व लसीकरण केंद्रांवर, प्रत्येक सत्रामध्ये पहिल्या डोस साठी ३० टक्के तर दुसऱ्या डोस साठी ७० टक्के लस साठा उपयोगात आणला जाणार आहे. वॉक इन आणि नोंदणी ह्या दोन्ही पद्धतीमध्ये हेच सूत्र पाळले जाणार आहे. उदाहरणार्थ, एका केंद्रावर जर दिवसभराच्या सत्रात १०० डोस दिले जाणार असतील तर त्यात ३० लस ह्या पहिला डोस घेण्यास येणाऱ्यांसाठी आणि ७० लस ह्या दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्यांना देण्यात येतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here