-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत सध्या सुरू असणारी काँक्रिटीकरण कामे अर्धवट न करता रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत (एन्ड टू एन्ड) पूर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. कामाचा आवाका आणि मर्यादित कालावधी यांची सांगड घालून देखील संपूर्ण रस्ता काँक्रिटीकरण काम पूर्णत्वास जाणार नसेल तर, रस्त्यातील चौक ते चौक (जंक्शन टू जंक्शन) काम पूर्ण करावे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. रस्तेकामे सुरू असताना वाहतुकीचे योग्य नियमन करण्यासाठी सुयोग्यपणे रस्तारोधक (बॅरिकेड्स) लावावेत, बांधकामाचा राडारोडा विखुरलेला नसावा, असे निर्देशही बांगर यांनी दिले. (BMC)
(हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी दरमहा ५० हजार रुपये देण्याचे DCM Eknath Shinde यांचे आदेश !)
मालाड दादी शेठ मार्गावरील मलनि:सारण प्रचालनाच्या कंत्राटदाराला नोटीस
मालाड (पश्चिम) येथील दादीसेठ मार्ग येथे मलनि:सारण प्रचालन (सीवेज ऑपरेशन्स) कामासाठी चेंबरचे खोदकाम केल्यानंतर तेथे सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करुन ते धोकादायक पद्धतीने खुले ठेवल्याप्रकरणी संबंधित अभियंत्यास नोटीस बजाविण्याचे व सक्त कारवाई करण्याचे निर्देश बांगर यांनी यावेळी दिले. (BMC)
मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेली रस्ते काँक्रिटीकरण कामे मध्यावस्थेत आहेत. या अंतर्गत मालाड पश्चिम काचपाडा येथील रामचंद्र मार्ग, कांदिवली पश्चिम येथील पारेख गल्ली, महावीर नगर मार्ग, मालाड पश्चिम येथील दादीसेठ मार्ग, मालाड शॉपिंग सेंटर जवळील मार्ग आणि बालाजी हॉटेल समोरील काँक्रिटीकरण कामांची पाहणी केली. मालाड पश्चिम येथील दादीसेठ मार्गावर काँक्रिटीकरण कामाबरोबरच मलनि:सारण प्रचालन विभागाचे कामकाज सुरू आहे. या ठिकाणी हमरस्त्यावर खोदकाम करत केवळ एकाच बाजूने बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तर उर्वरित बाजूने चेंबर धोकादायक पद्धतीने खुले असल्याची बाब निदर्शनास आली. या प्रकरणाची दखल घेत संबंधित अभियंत्यास नोटीस बजाविण्याचे व सक्त कारवाई करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले. बांगर यांच्या आदेशानुसार, चेंबरला तातडीने चहुबाजूने बॅरिकेड्स लावण्यात आले. (BMC)
(हेही वाचा – Asian Wrestling Championship : आशियाई कुस्ती स्पर्धेत रितिकाला रौप्य; मानसी, मुस्कानला कांस्य पदक)
मालाड शॉपिंग सेंटर जवळील मार्ग आणि बालाजी हॉटेल समोर एका बाजूचे काँक्रिटीकरण काम करताना दुस-या बाजूच्या रस्त्याची पातळी समतल असावी, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहिल, असे निरीक्षण नोंदवले. विशेषत: दुचाकींसाठी वाहतुकयोग्य रस्ता असावा, याची दक्षता बाळगावी. उपयोगिता वाहिन्यांचे स्थलांतरण करताना खबरदारी घ्यावी, असे निर्देश बांगर यांनी दिले. काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी करताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी (ऑन फिल्ड) उपस्थित राहणे अनिवार्य आहे. रस्तेकामादरम्यान, वाहतुकीचे योग्य नियमन करण्यासाठी सुयोग्यपणे रस्तारोधक (बॅरिकेड्स) लावण्याची जबाबदारी कंत्राटदारांची असली तरी त्यावर रस्ते विभागाच्या अभियंत्यांचे नियंत्रण हवे, असेदेखील बांगर यांनी नमूद केले. (BMC)
मालाड पश्चिम काचपाडा येथील रामचंद्र मार्ग, कांदिवली पश्चिम येथील पारेख गल्ली, महावीर नगर मार्ग काँक्रीटीकरण कामात स्लम्प चाचणी, कोन चाचणी करण्यात आली. त्यांचे परिणाम (रिझल्ट) योग्य असल्याचे निदर्शनास आले. याचबरोबर, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) च्या चमूने कार्यस्थळावरील प्रयोगशाळेत पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट (पीक्यूसी) नमुन्याची ‘क्यूब टेस्ट’ केली. या आकस्मित चाचणीचे परिणामदेखील योग्य आढळून आले. (BMC)
(हेही वाचा – Egypt मध्ये ४५ पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी समुद्रात बुडाली!)
ज्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, त्या रस्त्यांना थर्मोप्लास्ट, झेब्रा क्रॉसिंग, कॅट आईज, चौकांमध्ये पिवळ्या थर्मोप्लास्ट रंगाचे ग्रीड बसविणे इत्यादी कामे पूर्ण करावीत, जेणेकरुन त्या रस्त्यांची उपयुक्तता खऱ्या अर्थाने साध्य होईल, तसेच परिसराच्या सौंदर्यात भर पडेल. असे निर्देश बांगर यांनी दिले. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) चे सहायक प्रा. सोलोमन डिब्बार्ती, महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम, उप प्रमुख अभियंता (पूर्व उपनगरे) संजय बोरसे यांच्यासह गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community