चेंबूर माहुल गाव येथील मलजल प्रक्रिया केंद्रामध्ये प्रतिदिन १० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असून या मलप्रवाहातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठी केला जात आहे. हे प्रक्रिया केलेले पाणी हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड रिफायनरी यांना विक्री करण्यात येणार असून एक हजार लिटरसाठी ८ रुपये ७२ पैसे दराने या पाण्याची विक्री केली जाणार आहे. या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठी संबंधित कंपनी करेल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
चेंबूर माहुल येथील १०.३ दशलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे नुतनीकरणाचे काम ऑगस्ट २०२३मध्ये संपुष्टात येत आहे. या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे पाच वर्षांच्या कालावधीसाठी, विद्युत खर्च वगळून देखभाल व दुरुस्ती आदींचे काम नाईक एन्वायरमेंटल इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना दिले आहे. या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात मलजलावर दुय्यम स्तरापर्यंत प्रक्रिया केली जाते. आजवर प्रक्रिया केलेले पाणी ग्राहक नसल्याने पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य वाहिन्यांमध्ये सोडले जाते. परंतु आता या प्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण होत असल्याने यातील प्रक्रिया केलेले पाणी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड रिफायनरीने विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे ना नफा ना तोटा तत्वावर प्रति एक हजार लिटर पाणी हे ८ रुपये ७२ पैशांमध्ये या कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दर पुढील तीन वर्षांकरता कायम राहणार असून त्यानंतर पुढील दोन वर्षांकरता या दरामध्ये वाढ केली जाणार असल्याचे मलनि:सारण प्रचालन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community