-
सचिन धानजी,मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) पहिल्या टप्प्या ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेतल्यानंतर आता उर्वरीत सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या निविदा काढत कंत्राटदारांची निवड केली आहे. दुसऱ्या टप्प्यातही पाच विभागांमध्ये या निविदा काढण्यात आल्या असून शहर भाग वगळता पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठीच्या रस्त्यांच्या निविदा अंतिम होऊन या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही उपनगरांमधील रस्ते कामांसाठी विविध करांसह साडेसहा हजार कोटी रुपयांच्या मान्यता देण्यात आल्या आहेत. मात्र, शहर भागातील रस्ते कामांच्या दोन्ही टप्प्यातील निविदा अजुनही वाटाघाटीतच अडकल्या आहे. त्यामुळे शहर भाग वगळता उपनगरांमधील दुसऱ्या कामांनाही महापालिकेने मंजुरी दिल्यामुळे येत्या ऑक्टोबर महिन्यापासून या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल.
मुंबईत एकूण २०५० किलोमीटर रस्त्यांचे जाळे असून त्यातील एक हजार किलो मीटर लांबीचे रस्ते हे केवळ पश्चिम उपनगरांमध्ये आहे. तर उर्वरीत एक हजार ५० किलो मीटर लांबीचे रस्ते हे शहर आणि पूर्व उपनगर भागांमध्ये आहे. यातील १२५० किलो मीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून त्यात पश्चिम उपनगरांमधील ४९५ किलो मीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे, तर उर्वरीत सिमेंट काँक्रिट केलेले रस्ते हे पूर्व उपनगर आणि शहर भागांमधील आहेत.
(हेही वाचा – Crime : मृतदेह असलेली सुटकेस घेऊन तुतारी एक्सप्रेसने निघालेल्या मूकबधीर तरुणाला अटक, दुसऱ्याला नालासोपारा येथून अटक)
पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या ४०० किलो मीटर लांबीच्या रस्त्यांपैंकी शहर भाग वगळता पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील कामे प्रगतीप्रथावर आहेत तर काही कामे पूर्ण झालेली आहेत. पूर्व उपनगरातील ७० किलो मीटर लांबीचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेतले होते, त्यातील काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत,तर काही सुरु आहेत. परंतु शहर भागासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने नियोजित वेळेत काम न केल्याने त्यांचे कंत्राट रद्द करून त्यांना ६४ कोटींचा दंड आकारला आहे.
त्यामुळे शहर भागातील पहिला टप्पा आणि दुसरा टप्प्यातील रस्त्यांच्या कामांसह पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील रस्त्यांच्या कामांच्या निविदा महापालिकेने मागवल्या होत्या. त्यातील पात्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली. यामध्ये महापालिकेने अंदाजित लावलेल्या बोलीपेक्षा ४ ते ९ टक्के अधिक दराने लावलेल्या या कामांमध्ये कंत्राटदाराशी वाटाघाटी करून अंदाजित दरातच काम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पश्चिम उपनगरांतील तीन आणि पूर्व उपनगर आदी चार कंत्राट कामांना प्रशासक स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती मिळत आहे. तर शहर भागातील टप्पा एक व टप्पा दोन मधील रस्ता कंत्राट कामांबाबत पात्र कंपन्या या वाटाघाटीमध्ये बोली लावलेल्या दरातच काम करण्यास तयार असून अंदाजित दराएवढ्या किंमतीत ते काम करण्यास तयार नसल्याने याचे प्रस्ताव अडकले गेले आहेत. प्रशासनालाही याची जास्त घाई नसून प्रत्यक्षात हे काम ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याने सध्या रस्त्यांवरील खड्डे भरणे या कामाला प्रथम प्राधान्य दिले जात आहे, त्यामुळे वाटाघाटीमध्ये कंत्राटदार किती दर कमी करतो याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शहरातील दोन्ही टप्प्यील कामांचे प्रस्ताव वगळता दुसऱ्या टप्प्यातील सर्व रस्ते कामांना मंजुरी दिली असून वाहतूक पोलिसांच्या परवानगीची प्रक्रिया करून त्यांच्या मंजुरीने ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात या कामांना सुरुवात होईल,असा विश्वास महापालिका प्रशासनाला वाटत आहे. (BMC)
(हेही वाचा – भारतीय वंशाचे सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक M. Night Shyamalan)
दरम्यान, महापालिकेचे माजी विधी समिती अध्यक्ष, माजी नगरसेवक ऍड मकरंद नार्वेकर (Makarand Narvekar) यांनी शहर भागांतील रस्ते कंत्राट कामांसंदर्भात महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन देत या कंत्राट रकमेपेक्षा अधिक दराने दक्षिण मुंबईतील सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे कंत्राट दिल्यास लोकायुक्तांकडे दाद मागणार असल्याचा इशारा दिला आहे. करदात्यांचे पैसे कंत्राटदाराला बोनस म्हणून देऊ नका, नागरिकांना तो निवडणुकीपूर्वीचा भ्रष्टाचार वाटू शकतो,असे या निवेदनात म्हटले आहे. (BMC)
उपनगरांमधील रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर झालेली कंत्राटे
परिमंडळ ७ (कांदिवली ते दहिसर)
कंत्राट खर्च : विविध करांसह २३७४ कोटी रुपये
कंत्राट कंपनीचे नाव : बी एस सी पीएल
परिमंडळ ४ (विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम, गोरेगाव, मालाड)
कंत्राट खर्च : विविध करांसह २६५५.४५ कोटी रुपये
कंत्राट कंपनीचे नाव : आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
(हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक विधान; म्हणाले, Raj Thackeray यांच्या वर… )
परिमंडळ ३ (वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व आणि पश्चिम, विलेपाले ते जोगेश्वरी पूर्व)
कंत्राट खर्च : विविध करांसह १४६४.९२कोटी रुपये
कंत्राट कंपनीचे नाव : ए आय सी इन्फ्रास्ट्रक्चर्स
परिमंडळ ५ व ६ (संपूर्ण पूर्व उपनगर)
कंत्राट खर्च : विविध करांसह १६७५.९४ कोटी रुपये
कंत्राट कंपनीचे नाव : गावर कंस्ट्रक्शन लिमिटेड
हेही पहा –
Join Our WhatsApp Community