- सचिन धानजी, मुंबई
पाच महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेच्या ताब्यात आलेल्या पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पावसाळ्या पूर्वीची देखभाल आणि तातडीची कामे करण्यासाठी तब्बल १३१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. विशेष म्हणजे ज्या संयुक्त भागीदारीत असलेल्या कंपनीला दोन वर्षाकरिता काळा यादीत टाकण्यात आले होते तसेच काम अर्धवट सोडणे, काम योग्य प्रकारे न करणे, कामे पूर्ण करण्यात दिरंगाई करणे तसेच आर्थिक अपयश यासारख्या खराब कामगिरीचा पूर्व अनुभव या सर्व कामांमुळे ज्या कंपनीचे सादर केलेले प्रमाणपत्र पात्रता निकषाकरता ग्राह्य धरण्यात आले नाही, त्याच कंपनीला मेट्रो रेल्वेची कामे केल्याच्या अनुभवावर या रस्ते कामासाठी नियुक्त करण्याचा प्रताप रस्ते विभाग आणि संबंधित विभागाच्या अतिरिक्त आयुक्त यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एम.एम.आर.डी.ए यांच्या ताब्यातून पश्चिम द्रुतगती महामार्ग हा मुंबई महापालिकेला या रस्त्याची सुधारणा आणि देखभाल करण्याच्या दृष्टिकोनातून ०३ ऑक्टोबर २०२२ ला हस्तांतरित करण्यात आला. तब्बल २७.८५ किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पावसाळ्यापूर्वीची प्रतिबंधात्मक देखभाल आणि तातडीची कामे करण्यासाठी आणि या कालावधीमध्ये पावसाळ्यात दरम्यान या रस्त्याची कामे पूर्ण करून वाहतूक सुरळीत राखण्याच्या दृष्टिकोनातून दोन वर्षांच्या कालावधी करता कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निविदेत के.आर कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड – कोणार्क आणि आर अँड बी या संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीने उणे २७ टक्के दराने हे काम मिळवले असून हे काम विविध करांसह १३१ कोटींमध्ये केले जाणार आहेत.
(हेही वाचा BMC Mumbai : मुंबईतील साडेतीन हजार वाहनतळाच्या ठिकाणांना वाहतूक पोलिसांची परवानगी नाही)
या पात्र कंपनीसह आर.के. मधानी या तीन कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. यातील आर.के. मधानी ही कंपनी अप्रतिसदात्मक ठरली. मधानी या कंपनीने गुणवत्ता पात्र निकष पूर्ण न केल्याने या कंपनीला अपात्र ठरवले. तर प्रीती कंट्रक्शन व मेसर्स एम ई इन्फ्राप्रोजेक्ट या संयुक्त भागीदागी कंपनीने ४.३ किलोमीटर लांबीच्या रस्ते कामाची कागदपत्रे सादर केली. त्यामुळे या कंपनीचा अनुभव ग्राह्य धरण्यात आला. तर यासाठी पात्र ठरलेल्या के.आर.कंट्रक्शन या कंपनीने वांद्रे ते जोगेश्वरी पश्चिम या भागातील जोड रस्त्यांच्या साईट पट्टीचे मास्टिक डांबर द्वारे जे. कुमार कंपनी सोबत संयुक्त भागीदारीतत केलेल्या कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र सादर केले. मात्र जे. कुमार आणि संबंधित के.आर.कंट्रक्शन कंपनीला रस्ते घोटाळ्याच्या चौकशीत अंतिमत: काळ्या यादीत टाकण्यात आले होते. शिवाय काम अर्धवट सोडणे, काम योग्य प्रकारे न करणे, कामे पूर्ण करण्यात दिरंगाई करणे, त्यांचे आर्थिक अपयश यासारख्या खराब कामगिरीचा पूर्वानुभव या सर्व कामांमुळे या कंपनीने सादर केलेले प्रस्तावित प्रमाणपत्र पात्रता निकषाकरता ग्राह्य धरण्यात आले नाही.
त्यांच्या या कामाचा अनुभव महापालिकेने गृहीत धरला नाही. या त्यामुळे पात्र ठरलेल्या कंपनीने मेट्रो रेल्वेत केल्या कामाच्या आधारे प्रमाणपत्र सादर केले. या कंपनीने एमएमआरडीए यांच्याकडून प्राप्त झालेले प्रमाणपत्र सादर केले, त्यामध्ये त्याने आकुर्ली, पोईसर, मागाठणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान, ओव्हरी पाडा आणि दहिसर पूर्व येथील मेट्रो स्टेशन लाईन सातची अंमलबजावणी करणे या कामात करता ६२५८ मीटर लांबीचे काम केल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केले या प्रमाणपत्राच्या आधारे या कंपनीला पात्र ठरवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community