जागतिक योग दिनाच्या दिवशी काही ठिकाणी योगासने करत अनेकांनी हा दिवस साजरा केला. मात्र, शाळा बंद असल्याने ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. अनेक खासगी शाळांमधून या योग दिनानिमित्त योगाचे धडे देण्यात आले नाही, मात्र, दुसरीकडे महापालिका शाळांमधून आता कुठेतरी ऑनलाईन वर्गाचे बीज रोवले जात असतानाच त्यांच्या अनेक शाळांमधून मुलांना ऑनलाईन योगाचे धडे दिले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही या योगामध्ये भाग घेतला.
असे दिले ऑनलाईन धडे
२१ जून जागतिक योग दिन. शाळा बंद, पण शिक्षण चालू या महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्या संकल्पनेनुसार कांदिवलीतील गणेश नगर शाळा संकुलात ऑनलाईन योग दिन साजरा करण्यात आला. या योग दिनासाठी उप शिक्षणाधिकारी सुजाता खरे, अधिक्षक अशोक मिश्रा, शारिरीक शिक्षण विभागाचे वरिष्ठ पर्यवेक्षक ए.ओ.घाडगे, तसेच आर दक्षिण विभागाचे प्रशासकीय अधिकारी कल्पना संख्ये व शारिरीक शिक्षण विभागाच्या कनिष्ठ पर्यवेक्षिका सत्यशीला कांबळे इत्यादी मान्यवरांनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती. गणेश नगर मुबंई पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका निष्ठा वाईरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन योग वर्ग सुरु करून मुलांना योगाचे धडे देण्यात आले.
यावेळी शारिरीक शिक्षण विषयाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिके दाखवली व विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे ऑनलाईन योग साधना करुन दाखवली. तब्बल ९७ विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन योगा वर्गात सहभाग घेऊन या दिनाचा लाभ घेतला.
Join Our WhatsApp Community