-
सचिन धानजी, मुंबई
मुंबई महापालिकेतील शाळांमधील शिक्षण आणि शालेय व्यवस्थापन याची पाहणी करून त्यावर आपले नियंत्रण ठेवणाऱ्या महापालिकेच्या शिक्षण विभागातील निरिक्षक (शाळा) याची तब्बल १०० हून अधिक पदे रिक्त आहे. महापालिकेतील शिक्षण विभागात तब्बल याची १३२ पदे असून त्यातील केवळ ३२ पदेच कार्यरत असून मुख्याध्यापकांच्या खांद्यावरच याचा भार सोपवून एकप्रकारे शिक्षण विभाग मोकळा झाला आहे. त्यामुळे मुख्याध्यापक हे शाळेचा कारभार पाहणार की इतर शाळांमध्येही लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होत असून ही पदे न भरता शिक्षण विभागाचे काही हेकेखोर उपशिक्षणाधिकारी हे जाणीवपूर्वक याची भरती रोखून महापालिकेच्या शाळांचा दर्जा कसा घसरेल यासाठीच प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणार कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC School)
(हेही वाचा- BMC School : शिक्षणाचा दर्जा कसा उंचावणार? अनुभवी शिक्षक निवडणूक कामात, दीडशे रुपयांचे तासिका शिक्षक वर्ग खोल्यांवर!)
मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका असून प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे चार लाख विदयार्थी हे मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलगू, कन्नड आदी भाषिक शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. तसेच सी.बी.एस.ई.,आय.सी.एस.ई अशा शाळा महापालिकेच्या वतीने चालविल्या जात आहेत. (BMC School)
मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबाबत कायमच प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र शाळांची गुणवत्ता वाढवून विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विविध उपक्रम आणि संकल्पना राबवल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र शिक्षण विभागाचा कारभार हा भोंगळच असल्याचे दिसून येत आहे. (BMC School)
विशेष म्हणजे शाळांची गुणवत्ता वाढावी या करिता विभाग निरिक्षक (शाळा) हे पर्यवेक्षीय पद असते. पण ही पदेच रिक्त ठेवून महापालिका शाळांची गुणवत्ता आणि दर्जा कमी करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू आहे. महापालिका शिक्षण विभागात विभाग निरीक्षक शाळा याची १३२ पदे मंजूर आहेत. सन २००० पर्यंत विभाग निरीक्षकांची सर्व पदे l होती. परंतु त्यानंतर ही पद रिक्त होत गेली आणि ही पद वेळोवेळी न भरल्यामुळे आज स्थितीत ही पद केवळ ३२ वर आली आहे. अनेक वर्षापासून पदोन्नती व सरळ सेवा पध्दतीने याची भरती न झाल्याने ही पदे रिक्त आहेत. ज्याचा परिणाम आज महापालिकेच्या शिक्षणावर होतो (BMC School)
मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले जातात तसेच खाजगी शाळांच्या बरोबरीने राहण्यासाठी पर्यवेक्षण प्रबळ असावे लागते. शाळांच्या भेटी व तत्क्षणी शाळांना मार्गदर्शन करण्याचे काम या पदाचे असते. परंतू एवढे महत्वाचे पदे रिक्त असल्याने महापालिका शाळांमधील नियंत्रणच राहिलेले नसून परिणामी शाळांचा दर्जा घसरत चालला आहे. (BMC School)
आज ही पदे रिक्त असल्याने विभाग निरीक्षकांची जबाबदारी शाळांच्या मुख्याध्यापकांवर सोपविण्यात येत आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना स्वतःच्या शाळेत लक्ष देताना इतर अतिरिक्त शाळांच्या वरही लक्ष द्यावे लागते. त्यामुळे मुख्याध्यापक ना धड स्वतःच्या शाळांमधील व्यवस्थापन तसेच गुणवत्ता याकडे लक्ष देता येत नाही की इतर शाळांमध्ये. (BMC School)
एवढेच नाही तर जे ३२ विभाग निरीक्षक आहेत, त्यांच्याकडे प्रशासकीय अधिकाऱ्याचेही काम सोपविण्यात येते. त्यामुळे विभाग निरीक्षकालाही त्याची जबाबदारी पूर्णपणे पार पाडता येत नाही. त्याच्या परिणाम महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेवर होत आहे. मात्र विभाग निरीक्षकाची सुमारे १०० हून रिक्त पदे हे भरण्याबाबत वारंवार शिक्षक संघटनांकडून राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून महापालिका प्रशासनाकडे मागणी होत आहे. तसेच मागील वर्षी ही पदे भरण्याकरता प्रशासकीय मंजुरी सुद्धा प्राप्त झालेली आहे. तरीही महापालिकेतील काही उपशिक्षणाधिकारी हे ही पदे न भरण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जाणीवपूर्वक ही पद उपशिक्षणाधिकारी भरत नसून याकडे शिक्षणाधिकाऱ्यांचेही लक्ष दिसून येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे ही पदे न भरण्यामागे हेतू काय हे स्पष्ट व्हायला हवे. महापालिका प्रशासनाने ही पदे भरण्यास मंजुरी दिलेली असतानाही, महापालिका शिक्षण विभाग ही पदे भरण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करून एक प्रकारे महापालिका शाळांच्या शिक्षणाचा दर्जा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. (BMC School)
मुंबई महापालिका शिक्षक सेनेचे के. पी. नाईक यांनी १९ ऑगस्ट २०२४ रोजी अतिरिक्त आयुक्त अमित सैनी तसेच त्यापूर्वी उपायुक्त( शिक्षण) चंदा जाधव यांना निवेदन देवून या पदांची भरती करून चांगले शिक्षण उपलब्ध करावे ही विनंती केली आहे. महापालिका शाळांना चांगले दिवस आणायचे असल्यास पर्यवेक्षण सक्त करा त्यासाठी विभाग निरीक्षक ही रिक्त पदे पदोन्नतीने व सरळ सेवेने भरून शाळांमध्ये शिकण्यास येणाऱ्या गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण उपलब्ध करा असे म्हटले आहे. (BMC School)
तसेच म्युनिसिपल समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस ऋषीकेश घोसाळकर यांनीही महापालिका आयुक्त डॉ भुषण गगराणी यांना निवेदन देवून विभाग निरीक्षक यांची रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर यापूर्वी शिवसेना आमदार दिलीप लांडे आणि काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी ही पदे भरण्याची मागणी करूनही ही पदे भरण्यास शिक्षण विभाग उदासीन दिसत आहे. त्यामुळे महापालिका शाळांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावला जावा. शाळांचे व्यवस्थापन आणि विविध उपक्रम योग्य प्रकारे राबवले जाऊ नये हीच इच्छा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. (BMC School)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community