- सचिन धानजी,मुंबई
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांना शारीरिक कसरती करता याव्यात याकरता उपनगरांमधील तब्बल २०० शाळांमध्ये खुल्या व्यायामशाळा (Open Gym) बनवण्यात येणार आहे. पूर्व उपनगरांमधील १०० आणि पश्चिम उपनगरांमधील १०० अशाप्रकारे एकूण २०० शाळांमध्ये या खुल्या व्यायामशाळा स्थापित करण्यात येणार आहे. उद्यानांमधील ओपन जिमच्या धर्तीवर हे व्यायामाचे साहित्य शाळांच्या पटांगणात बसवण्यात येणार असून शाळकरी मुलांसह पालकांनाही या साहित्याचा वापर करता येणार आहे. (BMC School)
ओपन जिममध्ये याप्रकारचे असेल साहित्य
एअर वॉकर, चेस्ट प्रेस डबल, लेग प्रेस डबल, शोल्डर बिल्डर डबल, स्टँडींग व सीटींग ट्विस्टर, मल्टी फंक्शनल डबल, एक्सर सायकर दोन टायरसह अशाप्रकारचा प्रत्येकी २०० साहित्यांची खरेदी करून या खुल्या व्यायामशाळांची व्यवस्था महापालिकेच्या २०० शाळांमध्ये करून दिली जाणार आहे. (BMC School)
गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न
महापालिका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थी कोणत्याच क्षेत्रात मागे पडू नये म्हणून क्रीडा स्पर्धा, कौशल्य प्रशिक्षण, उपयोजित शिक्षण व तंत्रशिक्षण यांच्या समन्वयाने गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता महापालिकेच्या शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना खुली अथवा बंदिस्त व्यायाम शाळा स्थापन करून दिल्यास शारीरिक पात्रतेतील नैपुण्य वाढवण्यास संधी मिळते. त्यामुळेच पश्चिम उपनगरातील १०० शालेय इमारती व पूर्व उपनगरातील १०० शालेय इमारती अशाप्रकारे एकूण २०० शालेय इमारतींमध्ये खुली अथवा बंदिस्त व्यायाम शाळा स्थापन करण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात येत आहे. (BMC School)
(हेही वाचा – Rafael Nadal : बार्सिलोना ओपनमध्ये राफेल नदालचं आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात)
डिपीडीसीतून १० कोटींचा निधी मंजूर
महापालिकेच्या या शाळांमध्ये सध्या उद्यानांमध्ये ज्याप्रकारे ओपन जिमचे साहित्य बसवले जाते, त्याच प्रकारे बसवले जाणार आहे. त्यामुळे मुलांना खेळण्यातून शारीरिक कसरत करता येईल. मुलांना शाळा भरण्यापूर्वी तसेच मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यानंतर या ओपन जिमचा (Open Gym) लाभ घेता येईल. तसेच शाळा सुटण्यापूर्वी किंवा शाळा भरल्यानंतर मुलांना सोडण्यास येणाऱ्या पालकांनाही या ओपन जिमचा लाभ घेता येईल. यासाठी उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) माध्यमातून १० कोटी रुपये मंजूर करून महापालिकेला अदा करण्यात आले आहे. त्यातून या साहित्याची खरेदी केली जात आहे. (BMC School)
साहित्य खरेदीसाठी या कंपनीची निवड
उपनगरे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी महापालिकेला प्राप्त झाल्याने यासाठी निविदा मागवून साहित्याची खरेदी केली जात आहे. यासाठी झेनिथ स्पोट्स या कंपनीची निवड झाली आहे. यासाठी ९.७३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. (BMC School)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community