‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’ चे आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्यातील दुस-या रविवारी करण्यात येते. यानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशिष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार ‘महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा’ रविवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत विविध ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला आज मुंबईकर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त आणि विक्रमी प्रतिसाद दिला. मुंबईतील तब्बल ७७ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत ‘माझी मुंबई’ या विषयावर कल्पक – अभिनव आणि आकर्षक चित्रे चितारली.
या स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांची घोषणा येत्या २१ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे; तर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याचे उप आयुक्त केशव उबाळे यांनी दिली आहे.
गेली २ वर्षे कोविड साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा; यंदा प्रत्यक्ष स्वरुपात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त, उत्साहवर्धक आणि विक्रमी प्रतिसाद दिला. तब्बल ७७ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. मुंबईत २४ विभागांमध्ये प्रामुख्याने मालाड परिसराचा समावेश असलेल्या ‘पी उत्तर’ विभागात सर्वाधिक म्हणजे ७ हजार ५१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या खालोखाल प्रामुख्याने ‘कुर्ला’ परिसराचा समावेश असलेल्या ‘एल’ विभागात ५ हज़ार ४६५; तर दादर परिसराचा समावेश असलेल्या ‘एफ उत्तर’ विभागामध्ये ५ हजार १५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला अशी माहिती याबाबत अधिक माहिती देताना शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.
या स्पर्धेत उत्कृष्ट चित्रे चितारणा-या स्पर्धकांसाठी रुपये ५००/- ते रुपये २५ हजारांपर्यंतची तब्बल ५५२ पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर प्रत्येक स्पर्धकाला सहभाग घेतल्याचे प्रशस्तीपत्र आज स्पर्धा संपल्यानंतर लगेचच देण्यात आले. विशेष म्हणजे प्रशस्तीपत्र देण्यात आल्यानंतर सर्व सहभागी शालेय विद्यार्थ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खाऊ देखील देण्यात आला. चार गटातून ७७ हजार ४५३ स्पर्धकांनी भाग घेतला. तर या स्पर्धेच्या आयोजनासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागासह महानगरपालिका सुरक्षा दल आणि इतर विभागांचे मिळून ११ हजारांपेक्षा अधिक महानगरपालिका कर्मचारी विविध ठिकाणी कार्यरत होते.या स्पर्धेतील पुरस्कार विजेत्यांची घोषणा येत्या २१ जानेवारी रोजी करण्यात येणार असून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण हे या महिन्याच्या अखेरीस करण्यात येणार आहे; अशी माहिती महानगरपालिकेच्या शिक्षण खात्यातील कला उपविभागाचे प्राचार्य दिनकर पवार यांनी दिली आहे.