चिमुकल्यांच्या राख्या देशाच्या सैनिकांसाठी

81

महापालिका शाळांमधील मुलांकडून ऑनलाइन राख्या बनवून घेण्याचा कार्यक्रम शिक्षण विभागाच्यावतीने राबवण्यात आला आहे. या अंतर्गत मुलांनी बनवलेल्या राख्या ‘पोयसर हिंदी शाळा’ व बोरीवलीतील ‘सुमेर नगर शाळेने’ सैनिकांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या शाळांच्या वतीने १५१ राख्या या सैनिकांना पाठवल्या आहेत. ‘राखी आपल्या सैनिकांसाठी’ या उपक्रमांतर्गत या राख्या पाठवण्यात आल्या आहेत.

१५१ राख्या सैनिकांपर्यंत

प्रत्येक सण आणि उत्सवाच्या मागे एक सामाजिक व सांस्कृतिक उद्देश आहे. रक्षाबंधन हा एक असाच उत्सव आहे, बहीण भावाला राखी बांधते आणि एकमेकांमधील प्रेम आणि सद्भावना जागृत करते. आपल्या देशाचे सैनिक रात्रंदिवस सीमेवर तैनात राहून देशाची सुरक्षा करत असतात, ते आपल्या नातेवाईकांबरोबर सण-उत्सव साजरे करू शकत नाहीत. म्हणूनच शाळेने या सैनिकांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून विविध आकार, रंग आणि डिझाईनच्या राख्या बनवल्या आणि अशा एक-दोन नव्हे तर १५१ राख्या सैनिकांपर्यंत पोहोचवल्या.

सैनिकांसाठी आदरभाव

आर/मध्य विभागातील पोईसर हिंदी शाळा क्र.1, सुमेर नगर शाळा बोरिवली, पश्चिममध्ये सैनिकांसाठी राख्या पाठवण्याचा अनोखा उपक्रम झाला. या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी नेहमीच असे अनोखे उपक्रम राबवत असतात. मुख्याध्यापिका गीता कनोजे या नेहमीच सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना याबाबत प्रेरित करत असतात. शाळेचे कार्यानुभव शिक्षक कुशल वर्तक यांचे या उपक्रमास विशेष मार्गदर्शन लाभले. वर्तक सर यांनी यापूर्वी या कार्यक्रमात सहभागी होऊन अतिशय सुंदर आणि सुबक राख्या सैनिकांपर्यंत पोहोचवून सैनिकांसाठी आदरभाव व्यक्त केला आहे. कुशल वर्तक आणि शाळेच्या शारीरिक शिक्षण शिक्षिका धनश्री सावे यांनी सर्व वर्गांवर विशेष वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना प्रथम सैनिकांचे काही व्हिडिओ दाखवून, तसेच सैनिकांच्या खडतर जीवनाविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांची सैनिकांविषयी सद्भावना आणि आदरभाव जागृत केला.

आपण प्रत्यक्ष सीमेवर जाऊन लढू शकत नाही. परंतु अशा अनेक उपक्रमांत सहभागी होऊन आपले देशप्रेम आपण व्यक्त करू शकतो, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवली. हा उपक्रम राबवताना शाळेतील इतर शिक्षक स्वाती राईलकर, भावना चौहान, रमाकांत तिवारी, सविता यादव, सुरेश गायकवाड यांचेही सहकार्य लाभले. सैनिकांपर्यंत राख्या पोहोचवण्यासाठी मदत करणारे समाजसेवक व पालक अमित पाटील यांचे या उपक्रमास विशेष सहकार्य लाभले.

-आर/मध्य विभागाच्या प्रशासकीय अधिकारी

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.