मुंबई महापालिकेच्या कार्यानुभव विभागातर्फे रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून, ऑनलाईन राखी बनवण्याचा कार्यक्रम सर्व विभागात आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत आर विभागातील कांदिवली, बोरिवली व दहिसर हे तीन विभाग मिळून, हा दर्जेदार कार्यक्रम सादर झाला. यामध्ये सुमारे २०० मुलांनी सहभाग नोंदवत आकर्षक अशा राख्या बनवल्या.
शिक्षणाधिकारी राजू तडवी, उप शिक्षणाधिकारी(पश्चिम उपनगर) सुजाता खरे, अधीक्षक अशोक मिश्रा आदींच्या मार्गदर्शनाखाली कार्यानुभव निर्देशिका तृप्ती पेडणेकर यांनी योग्यप्रकारे नियोजन करत हा कार्यक्रम राबवला. याला विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. केंद्र प्रमुख भार्गव मेहता, उपकेंद्र प्रमुख कुशल वर्तक तसेच विषयाचे सर्व वरिष्ठ शिक्षक यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाची सुरुवात कुशल वर्तक यांच्या निवेदनाने झाली. सर्व विभागाचे मिळून १५० ते २०० विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
अतिशय सुंदर कलात्मक राख्या या चिमुकल्या हातांनी तयार केल्या. मोती, मणी, विविध धागे यांचा वापर करुन या चिमुकल्यांनी आकर्षक आणि सुंदर अशा राख्या बनवल्या. बी. म. सी. एज्युकेशन चॅनलचे जगदीश गायकवाड यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावून, मुलांचे कौतुक केले. शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण थांबले नाही, याची प्रचिती या कार्यक्रमात राख्या बनवताना मुलांचा तो उत्साह पाहताना दिसून येत होते. कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाचे काम शिक्षिका रुपाली बारी यांनी केले.
Join Our WhatsApp Community