मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थी दिवाळीनंतर आपल्या नवीन आकर्षक गणवेशात दिसणार असून महापालिकेने यासाठी नेमलेल्या कंत्राटदारांकडून सोमवारपासून गणवेशांचा पुरवठा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये गणवेशचा पुरवठा पूर्ण होऊन दिवाळीनंतर मुले शाळेत येताना ते परंपरागत सफेद रेखोट्यांचे शर्ट आणि निळी पँट आणि स्कर्ट ऐवजी आता निळ्या व तपकीरी चौकटचे सफेद शर्ट आणि तपकीरी पँट आणि स्कर्ट तसेच छोट्या शिशूचा लाल रंगाचा गणवेशात दिसणार आहेत. त्यामुळे तब्बल १५ वर्षांनी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा गणवेश बदललेला आता पहायला मिळणार आहे.
( हेही वाचा : अंधेरीत आमचा उमेदवार निवडून आला असता, पण..; शिंदेंनी सांगितले माघारीचे कारण)
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशासह २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप केले जात असून यंदा या साहित्यांच्या वाटपाला विलंब झाल्याने शालेय शिक्षण विभाग टिकेचा धनी बनला होता. शाळा सुरु झाली तरी हे साहित्य मिळाले नाही, उलट शाळा सुरु झाल्यानंतर निविद प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारांची निवड करण्यात आल्याने प्रशासनाला टिकेचे धनी व्हावे लागले होते. परंतु कालांतराने कंत्राटदारांकडून नियोजित वेळेत साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.
महापालिका शाळांमधील परंपरागत जुन्या गणवेश बदलून मुंबई पब्लिक स्कूलला अनुकूल अशाप्रकारे गणवेशाचे नवीन डिझाईन बनवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे आणि सहआयुक्त अजित कुंभार यांनी प्रयत्न केले. त्यांच्या संकल्पनेतून नवीन गणवेशाचे डिझाईन साकारले गेले आणि त्यामुळे याच्या निविदेला विलंब होऊन मुलांना वेळीच गणवेश उपलब्ध होऊ शकले नाही. परंतु आता उशिराने जरी हे गणवेश प्राप्त झाले असले तरी मुलांना वेगळ्या आकर्षक रंगाचे गणवेश मिळणार आहेत.
महापालिकेच्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोन गणवेशाचे जोड याप्रमाणे सात लाख गणवेशाच्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी ५० हजार गणवेश महापालिकेला प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी शाळांच्या मुलांचे गणवेश पुरवठ्याचा पहिला टप्प्यातील गणवेश सोमवारी प्राप्त झाले असून अशाप्रकारे आता हे गणवेश येत्या काही दिवसांमध्ये प्राप्त होतील,असे सांगितले. मुलांना हे गणवेश उशिराने मिळत असले तरी आता नवीन आणि आकर्षक डिझाईनमधील हे गणवेश असतील, असे सांगितले. जेव्हा जेव्हा गणवेशांचे पॅटर्न बदलले गेले तेव्हा तेव्हा अशाप्रकारे विलंब झालेले आहेत. त्यामुळे यापुढे हे गणवेश वेळेवर उपलब्ध होतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला .
महापालिकेने सन २००७मध्ये शेवटच्या गणवेशांचा पॅटर्न बदलून सफेद निळ्या राखाडी रेघांचे शर्ट व निळी पँट आणि स्कर्टद्वारे महापालिका शाळांमधील मुलांच्या गणवेशाचे रुपडे पालटवले होते, त्यानंतर आता अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त राजेश कुंभार यांच्यासह शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि राजू तडवी यांच्या प्रयत्नाने नवीन गणवेश साकारला गेला असून येत्या दिवाळीनंतर सुरु होणाऱ्या शाळेच्या सत्रांमध्ये महापालिकेची मुले नवीन आकर्षक आणि वेगळ्या रंगाच्या गणवेशात दिसणार आहेत.
Join Our WhatsApp Community