राज्याच्या संचलन सोहळ्यात महानगरपालिका सुरक्षा दल पथकास द्वितीय क्रमांक

118

महाराष्ट्र दिनी माननीय राज्यपाल महोदयांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत आयोजित राज्यस्तरिय पथ संचलन सोहळ्यादरम्यान सर्वोत्कृष्ट पथ संचलनाचे द्वितीय पारितोषिक मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलास मंगळवारी प्रदान करण्यात आले आहे. मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज मैदान(शिवाजी पार्क) येथे आयोजित एका विशेष सोहळ्यादरम्यान अप्पर पोलिस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंह यांच्या हस्ते आणि पोलिस सह आयुक्त (प्रशासन) मुंबई, एस. जयकुमार आणि अप्पर पोलिस आयुक्त (सशस्त्र पोलिस दल) आरती सिंह यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. १ मे २०२२ रोजीच्या पथ संचलनादरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या ७२ सुरक्षा रक्षकांचा समावेश असलेल्या पथकाने भाग घेतला होता.

महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाच्या या गौरवाबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार आणि उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचे अभिनंदन केले आहे.

दरवर्षी महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी दादर पश्चिम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा आयोजित होतो. माननीय राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत साज-या होणा-या या सोहळ्यादरम्यान विविध गणवेशधारी दलांच्या पथकांचे पथसंचलन देखील मोठ्या जोशात व उत्साहात होत असते. यामध्ये महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचाही सहभाग असतो.

दिनांक १ मे २०२२ रोजीच्या पथ संचलनादरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या ७२ सुरक्षा रक्षकांचा समावेश असलेल्या पथकानेही भाग घेतला होता. या पथकाचे नेतृत्व विभागीय सुरक्षा अधिकारी सुनील होळकर, सहाय्यक सुरक्षा अधिकारी संदीप मुळे व सहाय्यक सुरक्षा अधिकारी नितीन महाजन यांनी केले होते. या संचलनाकरिता महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचे प्रशिक्षक छोटू साळुंखे, रविंद्र परदेशी व दिगंबर अमोदकर यांनी पथ संचलनात सहभागी झालेल्या सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण दिले व सराव करवून घेतला. हे तिन्ही प्रशिक्षक भारतीय सैन दलातील सेवानिवृत्त जवान आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलात २,०४१ सुरक्षा रक्षक कार्यरत असून त्यात ४४२ महिला सुरक्षा रक्षकांचा व भारतीय सैन्य दलातील १२० सेवानिवृत्त जवानांचा देखील समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.