मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त (BMC Assistant Commissioner) पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला असून यासाठी सात उत्तीर्ण तथा निवड झालेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या सात सहायक आयुक्त पदाचा निकाल जाहीर झाल्याने महापालिकेतील सात सहायक आयुक्त पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे या सर्वांची नियुक्ती सहायक आयुक्त पदी करून घेतल्यानंतर प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतरच या सर्वांना विविध विभागांच्या सहायक आयुक्त पदी नियुक्ती केली जाणार आहे. (BMC)
महापालिकेतील १६ सहायक आयुक्त पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. याची लेखी परीक्षा आणि मुलाखती पार पडल्यानंतर याचा निकाल जाहीर करणे अपेक्षित होते. पण एमपीएससी द्वारे याचा निकाल जाहीर केला जात नसल्याने या विरोधात महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार एमपीएससीद्वारे सहा सहायक आयुक्त यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सहा जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या सर्वांना सहायक आयुक्त पदी नियुक्त केल्यानंतर त्यांना प्रशासकीय कामाबाबतचे प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विभाग कार्यालयाच्या किंवा विभागाच्या सहायक आयुक्त पदी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले जाणार आहे. (BMC)
मागील काही महिन्यात रमेश पवार, रामदास आव्हाड, रणजित ढाकणे, सुनील धामणे, हर्षद काळे, मिलिन सावंत, चक्रधर कांडलकर, मिनेश पिंपळे आदींसह काही प्रभारी सहाय्यक आयुक्त हे सेवा निवृत्त झाले आहेत. त्यामुळे सहायक आयुक्त पदाचा भार कार्यकारी अभियंता यांच्याकडे प्रभारी सोपविण्यात आला आहे. सद्या २६ प्रशासकिय कार्यालयासाठी संध्या नांदेडकर, मनीष वळंजू, अजित कुमार आंबी, गजानन बेल्लाळे, विनायक विसपुते, महेश पाटील, मृदुला अंडे आदी कायम सहायक आयुक्त असून किरण दिघावकर, विश्वास मोटे, संतोष धोंडे यांच्याकडे उपायुक्त पदासह विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा प्रभारी भार सोपवला आहे. सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तपदाच्या ३३ जागा असून आजमितीस २० ते २१ पदे ही रिक्त असून त्यातील १५ ते १६ पदांवर कार्यकारी अभियंता यांच्यावर प्रभारी भार सोपवला आहे.
महापालिकेने जेव्हा एमपीएससी (MPSC) परीक्षा घेवून निवड करण्याचे कळवले होते तेव्हा महापालिकेत सहायक आयुक्त पदासाठी १६ उमेदवारांची गरज होती. पण आज गरज वाढूनही केवळ ७ जणांची निवड जाहीर करून उर्वरित ०९ जणांची निवड रोखून ठेवली आहे. त्यामुळे किमान हा निकाल जाहीर झाल्याने महापालिकेला रिक्त जागांपैकी सात सहाय्यक आयुक्तांच्या जागा भरणे सोपे जाणार आहे.