
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
शिवसेना उबाठाच्या नेत्यासह आमदारांना टाळून पक्षाचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांची भेट घेतली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना नेते आणि पक्षाच्या आमदारांनी मंगळवारी सकाळी बोरिवलीतील भगवती रुग्णालय सार्वजनिक खासगी सहभाग तत्वावर देण्यास विरोध दर्शवण्यासाठी भेट घेतली होती. त्यानंतर दुपारी चार वाजता आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. विशेष म्हणजे आयुक्तांच्या देनंदिन भेटीच्या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांच्या भेटीची वेळ नव्हती, तरीही आयुक्त त्यांना भेटले. त्यामुळे आदित्य ठाकरेंना सकाळी सर्वांसोबत आयुक्तांना का भेटावेसे वाटले नाही आणि त्यांनी आपल्या नेत्यासह आयुक्तांना भेटण्याचे टाळले असा सवाल उपस्थित होत आहे. (BMC)
मुंबई महापालिकेच्यावतीने आरोग्य विभागाच्यावतीने रुग्णालये खासगी संस्थांच्या वतीने चालवण्यासाठी सार्वजनिक खासगी सहभाग अर्थात पीपीपी धोरण मंजूर करून यासाठी बोरिवलीतील भगवती रुग्णालयासह अन्य चार रुग्णालयांकरता जाहिरात प्रकाशित केली आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी यापूर्वी शिवसेना उबाठाचे उपनेते विनोद घोसाळकर तसेच त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यानंतर मंगळवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने नेते आणि आमदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यामध्ये त्यांनी भगवती रुग्णालय पीपीपी अंतर्गत खासगी संस्थेला चालवण्यास न देता याचे काम त्वरीत पूर्ण करून महापालिकेच्यावतीने लवकरच सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले जावे अशी मागणी केली. मुंबईमध्ये रहिवाशांना सध्या कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. बऱ्याच ठिकाणी गढुळ पाणी तसेच अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. मुंबई शहरामध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपलब्ध असलेले टँकर धारक काही प्रमाणात पाणीपुरवठा करत असतात, परंतु सध्या तेही संपावर गेलेले आहेत त्यामुळे मुंबईकरांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत. उन्हाळा तोंडावर असतानाच पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे, तरी आपण पत्रकार परिषद घेऊन हा मुंबईतील पाणी प्रश्न कसा सोडवणार याबाबत मुंबईतील जनतेला अवगत करून आश्वस्त करावे. अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी करून टँकर चालकांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन त्यांचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. (BMC)
(हेही वाचा – MMR साठी चार लाख कोटींचे सामंजस्य करार)
सकाळी शिवसेना उबाठाच्या सर्व नेत्यांनी भेट घेतल्यानंतर दुपारी चार वाजता शिवसेना उबाठाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे काही लोकांना सोबत घेऊन आयुक्तांना भेटले. आयुक्तांच्या दैनंदिन भेटीच्या कार्यक्रम पत्रिकेवर आदित्य ठाकरेंच्या भेटीची वेळ निश्चित नसताना गगराणी यांनी त्यांना दुपारी चार वाजता भेटण्याची वेळ दिली. सकाळी शिवसेना उबाठाचे शिष्टमंडळ येऊन आयुक्तांना भेटतात आणि दुपारी स्वत: आदित्य ठाकरे येऊन भेट घेतात. तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकांची ८०१ पदे रिक्त असल्याने कंत्राटी सहायक प्राध्यापकांना कायम करून घ्यावे या मागणीसाठी आपण भेटल्याचे नमुद केले आहे. मात्र, सकाळी या पक्षाचे नेते आरोग्याच्या मुद्द्यावरून आयुक्तांची भेट घेतात आणि दुपारी त्यांच्या पक्षाचे नेते आरोग्याच्या मुद्द्यावर आणि पाण्याच्या प्रश्नावर पुन्हा आयुक्तांची भेट घेतात. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त हे शिवसेना उबाठासाठीच काम करतात का असा सवाल उपस्थित होत आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community