महापालिका मुख्यालयातील राजकीय पक्षांच्या कार्यालयांना सिल ठोकत माजी नगरसेवकांना कार्यालयात प्रवेश बंदी केल्यानंतर बाहेर सोफ्यावर बसून हजेरी नोंदवणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता बाहेर बसण्यासही प्रशासनाने बंदी आणली आहे. पक्ष कार्यालय सिल केल्यामुळे त्याबाहेर बसण्यासाठी ठेवलेले सोफा व बाकडेही हटवण्यात आले आहे. त्यामुळे आधी कार्यालयांना सिल आता बसण्यासाठी असलेली आसनेही हटवल्यामुळे यापुढे माजी नगरसेवकांना महापालिका मुख्यालयातील क्षणभर विश्रांतीही घेता येणार नाही. या काम करा आणि निघू जा अशाच प्रकारचा संदेश प्रशासनाच्या माध्यमातून सोफा हटवून देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महापालिका मुख्यालयातील विविध पक्ष कार्यालयांना वाटप करण्यात आलेली कार्यालये ही ७ मार्च २०२२ रोजी महापालिकेतील त्यांची मुदत संपुष्टात आणल्यानंतर सिल करणे आवश्यक होते. परंतु आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणूक दृष्टीक्षेपात नसल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासकांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष सर्व कार्यालये खुली करून दिली होती. परंतु शिवसेना पक्ष कार्यालयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी या कार्यालयावर दावा सांगितल्यानंतर उध्दव गट आणि शिवसेना यांच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शिवसेना पक्ष कार्यालय सिल करण्यात आले होते. त्यानंतर इतरही पक्षांची कार्यालये सिल करण्यात आली.
(हेही वाचा गड-दुर्ग रक्षण महामोर्च्याचा IMPACT: तीन महिन्यांत स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची होणार स्थापना)
तेव्हापासून उध्दव ठाकरे गटासह भाजपचे माजी नगरसेवक हे कार्यालयाबाहेरील सोफ्यावर बसून राहायचे. कार्यालय बंद असल्याने नगरसेवकांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी सोफा तसेच बाकडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे या सोफा व बाकड्यांवर माजी नगरसेवक हे बसून असायचे. उध्दव ठाकरे गटाचे व भाजपचे माजी नगरसेवक हे सातत्याने येत आहे. परंतु मागील आठवड्यांमध्ये उध्दव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना घेराव घालून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. ही भेट पालकमंत्र्यांना दिलेले निधी वाटपाचे अधिकार काढून घेण्याची मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली. परंतु ही मागणी असतानाच मोठ्या संख्येने माजी नगरसेवक महापालिका मुख्यालयात प्रवेश केल्यामुळे आयुक्तांनी याची दखल घेत यापुढे जमावाने माजी नगरसेवकांना मुख्यालयात प्रवेश न देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे माजी नगरसेवकांना केवळ कामांनिमित्तच प्रवेश देण्याचे निर्देश् देण्यात आले होते. परंतु भविष्यात याठिकाणी ठेवण्यात आलेल्या सोफा व बाकड्यांवर नगरसेवक येवून बसल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने प्रशासनाने शुक्रवारी रात्रीच या पक्ष कार्यालयाबाहेर असलेले सर्व सोफा व बाकडेच कायमचे हटवले आहे. त्यामुळे पक्ष कार्यालयाबाहेरील माजी नगरसेवक व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी असलेले सोफा व बाकडे हटवण्यात आल्याने यापुढे कोणत्याही प्रकारची आसनाची व्यवस्था नाही. त्यामुळे आता विविध राजकीय पक्षांचे माजी नगरसेवक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.