मुंबईतील मिठी नदीसह इतर नदी आणि काही मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी मागील वर्षी शिल्ट पुशर मशिन्स आणि ड्रेझरचा वापर करण्यात आला आणि या मशिन्सच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या गाळासाठी पारंपारिक नालेसफाई पेक्षा सातशे ते आठशे रुपये अधिक मोजले गेले होते. परंतु याबाबत महापालिकेच्या दक्षता विभागाने आक्षेप नोंदवल्यानंतर याची दखल घेत यंदाच्या नालेसफाईच्या कामांमध्ये या मशिन्सच्या माध्यमातून सफाई करताना जास्तीचे पैसे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुशर मशिन्सद्वारे सफाई केल्यास महापालिकेला जास्त पैसे मोजावे लागणार नसून यामुळे कंत्राटदारांकडून होणारी संभाव्य आर्थिक फसवणूक टाळण्याचा प्रयत्न दक्षता विभागाच्या निरीक्षणानंतर प्रशासनाने केला आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळामध्ये नालेसफाईच्या कामांसाठी प्रथमच शिल्ट पुशर मशिन व ड्रेझरचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये मिठी नदीसह इतर नदी आणि मोठ्या नाल्यांची सफाईसाठी या मशिनरीचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे या मशिनद्वारे केलेल्या सफाईसाठी २२०० रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता आणि पोकलेनद्वारे पारंपारिक पध्दतीने केलेल्या सफाईसाठी १६०० रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता.
मात्र, या सफाईच्या कामांबाबत दक्षता विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी शंका उपस्थित करत पारंपारिक पध्दतीने सफाई करून पुशरद्वारे केल्याचे दाखवून जास्त पैसे आकारले जातील किंवा अधिकाधिक सफाई पुशरद्वारे करून जास्त पैसे घेतले जातील अशी टिप्पणी नोंदवली होती. याबाबत दक्षता विभागाने अतिरिक्त आयुक्त(प्रकल्प) पी वेलरासू यांच्याही ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी यंदाच्या नालेसफाईमध्ये या मशिनद्वारे अधिक पैसे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या मशिनद्वारे सफाई केल्यास अधिक पैसे देणार नाही अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतल्याने पुशर मशिन तसेच पारंपारिक मशिनद्वारे सफाई केल्यास यंदा १६०० रुपयांचाच दर देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महापालिकेच्या संभाव्य आर्थिक धोका टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दक्षता विभागाच्या एका टिप्पणीमुळे महापालिकेची एकप्रकारे होणारी आर्थिक लूट टाळण्याचा प्रयत्न महापालिकेला टाळता आली आहे. त्यामुळे यंदाच्या नालेसफाईमध्ये मिठी नदीसह काही मोठ्या नाल्यांची सफाई शिल्ट पुशर मशिनद्वार केली जाणार असली तरी त्यासाठी मागील वर्षांप्रमाणे महापालिकेला जास्तीचे पैसे मोजावे लागणार नसून दक्षता विभागाने महत्वाच्या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष अधोरेखित केल्याने ही संभाव्य आर्थिक फसवणूक टाळता आली आहे.
(हेही वाचा – मुंबईतील २० अपघातप्रवण वाहतूक चौक बनणार सुरक्षित)
Join Our WhatsApp Community