जंबो कोविड सेंटरसाठी २० कोटींच्या औषधांची खरेदी

तब्बल २० कोटी ७२ लाख रुपयांची ही औषधे खरेदी केली असली, तरी दुसऱ्या लाटेत प्रत्येक रुग्णापर्यंत ही औषधे पोहोचू शकली नसल्याची माहिती मिळत आहे.

146

मुंबईत कोविडच्या दुसऱ्या लाटेला फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. मात्र, कोविडची पहिली लाट संपल्यानंतर कोविड रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांची खरेदी करण्यासाठी, डिसेंबर महिन्यात मागवलेल्या निविदेतील पात्र कंपन्यांकडून प्रशासनाने परस्पर औषधांची खरेदी केली. तब्बल २० कोटी रुपयांची औषधे जंबो कोविड सेंटरसाठी खरेदी करण्यात आली आहेत.

निविदांसाठी जाहिरात

मुंबईतील कोविड रुग्णांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यासाठी महापालिकेने जंबो कोविड सेंटरची निर्मिती केली. या जंबो कोविड सेंटरमध्ये अनेक रुग्णांना दाखल करुन, त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे जंबो कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची कोणत्याही प्रकारे हयगय होऊ नये, म्हणून महापालिकेने संबंधित आजारांवरील औषधांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या जंबो कोविड सेंटर्सना कोविड संबंधित औषधांचा पुरवठा करण्यासाठी मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत १८ डिसेंबर २०२० पर्यंत निविदा प्राप्त होतील, अशाप्रकारे जाहिरात दिली होती.

(हेही वाचाः महापालिकेच्या मुख्य लिपिकांच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या)

२० कोटी ७२ लाख रुपयांची औषध खरेदी

कोविड संबंधित औषधांचा जंबो कोविड सेंटर्सना पुरवठा करण्यासाठी मागवलेल्या ई-निविदा १५ फेब्रुवारी २०२१ रोजी उघडण्यात आल्या. परंतु ऑगस्ट महिना उलटला तरी याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला नाही. प्रशासनाने समितीची मान्यता न घेताच, २० कोटी रुपयांची औषधे खरेदी करत कंत्राटदारांकडून परस्पर औषधांचा साठा उपलब्ध करुन घेतला. औषधांच्या पुरवठा कंत्राटालाच मंजुरी नसल्याने, प्रशासनाने परस्पर आपल्याच अधिकारात या कंत्राटदारांकडून औषधांची खरेदी केली. तब्बल २० कोटी ७२ लाख रुपयांची ही औषधे खरेदी केली असली, तरी दुसऱ्या लाटेत प्रत्येक रुग्णापर्यंत ही औषधे पोहोचू शकली नसल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईमध्ये फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर या औषधांचा पुरवठा मार्च महिन्यापासून पुढील सहा महिन्यांकरता होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात दुसरी लाट ओसरत असतानाच ही औषधे उपलब्ध करुन देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः ईशान्य मुंबईतील नगरसेवकांना कोटकांनी घडवली दिल्लीवारी)

१२ ऑगस्टपासून पुन्हा जंबो कोविड सेंटर सुरू

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जंबो कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. सध्या जंबो कोविड सेंटर दुरुस्ती तथा डागडुजीच्या कामासाठी बंद होते, ते पुन्हा एकदा १२ ऑगस्टपासून टप्याटप्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. मुंबईत जून महिन्यात आलेल्या तौक्ते वादळादरम्यान बांद्रा बीकेसी, दहिसर, मुलुंड, भायखळा येथील कोविड सेंटर बंद करण्यात आली. त्याची दुरुस्ती करुन ही सेंटर सज्ज ठेवण्यात आली आहेत.

कोविड सेंटरमधील खाटांच्या संख्येतही वाढ

मुंबईत मालाड, सायन चुनाभट्टी सोमय्या मेडिकल सेंटर आणि कांजुरमार्ग या तीन ठिकाणी प्रत्येकी दोन हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. सध्या बीकेसी, वरळी, गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोविड सेंटर उभारताना आवश्यकतेनुसार विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे. या सर्व केंद्रांत गरजेनुसार प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सहा हजार अधिक खाटा वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे कोविड सेंटरमधील खाटांची संख्या २० हजार इतकी झाली आहे.

(हेही वाचाः भाजपच्या रणनीतीपुढे शिवसेना गारद! ‘तो’ प्रस्ताव ठेवला राखून)

७० टक्के ऑक्सिजन बेड

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जम्बो कोविड सेंटर सुरू करताना, ७० टक्के ऑक्सिजन बेड, १० टक्के आयसीयू बेड उपलब्ध करण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे जम्बो सेंटरमध्ये लहान मुलांसाठी वॉर्ड असेल. पालकांना याठिकाणी थांबण्याचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.