नालेसफाईच्या कामांची नौटंकी होणार बंद! सफाईबाबत शंका आहे तर करा ‘या’ लिंकवर क्लिक

मुंबईत सुरु असलेल्या नालेसफाईबाबत महापालिकेवर दरवर्षी होणाऱ्या टिकांमुळे यंदा  या सफाईच्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. नालेसफाईच्या कामांची क्षणोक्षणीची माहिती मिळण्यासाठी महापालिकेने आता कोविडच्या धर्तीवर डॅशबोर्ड तयार केला आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या नाल्यातील सफाई किती प्रमाणात झाली आहे, याची माहिती केवळ एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. नागरिकांना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर https://swd.mcgm.gov.in/wms2022 या लिंकवर सफाईच्या कामांची माहिती जाणून घेता येणार आहे. यासाठी संगणकाची गरज नसून आपल्या मोबाईलवरूनही ही लिंक ओपन करत किती गाळ काढून कुठल्या डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे आता नालेसफाईच्या कामांवरून कुणालाही नौटंकी करता येणार नाही ना कुणालाही टिका करता येणार नाही.

८ लाख ८८ हजार मेट्रिक टन गाळ मुंबई बाहेर नेण्यात येतो

मुंबई महानगरात ०५ नद्या असून एकत्रित ३०९ मोठे नाले आहेत. त्‍यांची लांबी साधारणतः २९० किलोमीटर आहे. तसेच मुंबई महानगरात जवळपास ५०८  छोटे नाले असून त्यांची लांबी ६०५ किलोमीटर आहे. त्याव्यतिरिक्त महानगरपालिका क्षेत्रात रस्‍त्‍यालगत गटारे असून त्यांची लांबी जवळपास २,००४ किलोमीटर आहे. नदी नाल्यांमधून साचलेला गाळ हा दरवर्षी पावसाळ्यापूर्वी काढून क्षेपणभूमीवर वाहून नेला जातो. मोठ्या नाल्यातून जवळपास ४ लाख ६३ हजार मेट्रिक टन तसेच  छोटे नाले व पावसाळी गटारे यातून ४ लाख २४ हजार मेट्रिक टन एवढा गाळ काढला जातो. एकूणच जवळपास ८ लाख ८८ हजार मेट्रिक टन गाळ हा मुंबई बाहेर नेण्यात येतो. या एकूण गाळापैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढण्यात येतो.

(हेही वाचा बहुसदस्यीय प्रभाग रचनेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली)

सहजपणे मोबाईलद्वारे देखील पाहता येणार

आतापर्यंत सरासरी ३८ टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून हा गाळ नेमका कुठून आणि कशाप्रकारे काढला जातो, सर्वसामान्यांना नेहमीच कुतूहल असते. याबाबतची अद्ययावत माहिती सर्वसामान्य जनतेला मिळावी म्हणून महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या सुचनेनुसार व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाने मुंबई महानगरपालिकेने एका विशिष्ट सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. त्या सॉफ्टवेअरची लिंक मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर https://swd.mcgm.gov.in/wms2022 या नावाने देण्यात आली आहे. ही लिंक वापरुन प्रत्येक नागरिकाला आपल्या विभागामधील नाल्याची गाळ काढून स्वच्छता कशी केली जाते, ते सहजपणे मोबाईलद्वारे देखील पाहता येणार आहे. ही सुविधा शुक्रवारपासून नागरिकांसाठी उपलब्ध असल्याची माहिती उपायुक्त उल्हास महाले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

गाळ काढण्यासाठी १७ निविदा मंजूर केल्या

या लिंकवर विभागातील विविध नाल्‍यांची तपशीलवार माहिती, प्रत्येक नाल्यामधून काढलेल्या व वाहून नेलेल्या गाळाचा तपशील, गाळ वाहून नेणा-या प्रत्येक वाहनाचा छायाचित्रांसह तपशील आणि नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे सुरु असतानाची छायाचित्रे/दृश्‍य चित्रफीत नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार व सुलभरित्या दररोज पाहता येणार आहे. यंदा महानगरपालिकेने मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी ०६ निविदा मंजूर केल्या आहेत. तर छोटे नाले व रस्त्यालगतची गटारे यातील गाळ काढण्यासाठी १७ निविदा मंजूर केल्या आहेत. महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामासाठी प्रत्येक विभागात एक पथक गठीत केले असल्याची माहिती उपायुक्त  उल्हास महाले यांनी दिली आहे.

कोणती माहिती मिळणार?

यामध्ये प्रत्येक अभियंता, कंत्राटदारांना याचे लॉगीन आयडी देण्यात आला असून या मोबाईल ऍपवर प्रत्येक ठिकाणचा काढलेला नाल्यातील गाळ, ट्रकमध्ये भरलेला गाळ, प्रत्येक ट्रकचे वजन काट्यावरील वजन, सीसी टिव्ही कॅमेरातील आदींची फोटो व व्हिडीओ या ऍपमध्ये अपलोड केले जात असून वजन काट्याच्या मोजमापानंतर याची नोंद होत जाईल, त्याप्रमाणे याची माहिती अपडेट होत जाईल आणि नागरिकांना क्लिकवर ही माहिती मिळू शकेल, असे उल्हास महाले यांनी सांगितले. याप्रसंगी पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता अशोक मेस्त्री, उपप्रमुख अभियंता (पूर्व उपनगरे) विभास आचरेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here