दक्षिण मुंबईतील गोल देऊळ, अलंकार सिनेमा, अलीभाई प्रेमजी मार्ग, मुंबई सेंट्रल आदी ठिकाणी पावसाचे पाणी तुंबते. या तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सध्याच्या पावसाळी वाहिन्या या खोल बोगद्या(डिप टनेलिंग)द्वारे टाकण्याचा विचार सुरू आहे. तसेच मुंबई सेंट्रल पूर्व पार्सल डेपो व रुसी मेहता सर्कल तथा गिल्डर लेन, वेलिंग्टन गोल्फ कोर्स मार्गे सध्याच्या हाजीअली पंपिंग स्टेशनमधील जागेत किंवा लगतच्या गार्डनमध्ये नव्याने पंपिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या कामांचा अभ्यास करण्यासाठी आता महापालिकेच्यावतीने सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. या सल्लागारामार्फत जमिनीखाली युटीलिटीजचा शोध घेऊन काम करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही ना, याचा अभ्यास अहवाल सल्लागार तयार करणार आहे.
खोल बोगद्याद्वारे पर्जन्य जलवाहिनी
मुंबईतील २६ जुलै २००५च्या महापुरानंतर राज्य सरकारने डॉ. माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समितीचा अहवाल सादर केला. या अहवालातील शिफारशी व महापालिकेचे सल्लागार एमडब्ल्यूएच इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या ब्रिमस्टॉवॅड २च्या अहवालानुसार महापालिकेच्या सी, डी व ई या विभागांतील गोल देऊळ, अलंकार सिनेमा, अलीभाई प्रेमजी मार्ग, मुंबई सेंट्रल व इतर ठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी काही पर्याय सुचवले होते. परंतु या सल्लागाराने सुचवलेले तिन्ही पर्याय हे व्यवहार्य नव्हते, तसेच तांत्रिकदृष्ट्या शक्य होणारे नव्हते. त्यामुळे महापालिकेने या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी याठिकाणी पर्जन्य जलवाहिनी खोल बोगद्याद्वारे टाकण्याचा प्रस्ताव तयार केला. जो मुंबई सेंट्रल पार्सल डेपो व रुसी मेहता, गिल्डर लेन, वेलिंग्टन गोल्फ कोर्स मार्गे जाईल. सध्याच्या हाजीअली पंपिंग स्टेशनमधील जागेत किंवा लगतच्या गार्डनमधील जागेत नवीन पंपिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
(हेही वाचाः मुंबई महापालिका निवडणूक : निवडणूक आयोगाची शिक्षकांवर कारवाईची नोटीस!)
सल्लागाराची नेमणूक
या दोन्ही प्रस्तावांचा अभ्यास करण्यासाठी, रस्त्याच्या खाली अस्तित्वात असलेल्या विद्युत वाहिन्या, जलवाहिन्या, मल नि:स्सारण वाहिन्या व इतर सुविधा वाहिन्या यांचे नकाशे तयार करणे, नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असतानाच, येणाऱ्या संभाव्य अडचणी आदींचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे.
२२५ कोटींचा खर्च अपेक्षित
या सर्व कामांसाठी २२५ कोटींचा खर्च अपेक्षित मानला जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम विनाअडथळा पूर्ण करता यावे, यासाठी सल्लागाराच्या अभ्यास अहवालानंतर ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी एनजेएस इंजिनियर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
(हेही वाचाः दादर चैत्यभूमीप्रमाणेच गिरगाव चौपाटीवरही पर्यटकांसाठी पाहणी कट्टा)
Join Our WhatsApp Community