वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोडवरील रेल्वे कॉलनीमध्ये पावसाळ्यात भरणाऱ्या पाणी समस्येवर आता कायमची मात करण्याचा निर्णय महापालिकेने BMC घेतला असून त्यादृष्टीकोनातून याला जोडणाऱ्या नाल्याचे पुनर्बांधकाम केले जाणार आहे. या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत असून यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
पश्चिम उपनगरातील वांद्रे पश्चिमेतील एस.व्ही. रोड येथील रेल्वे कॉलनी परिसरात पावसाळ्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. याबाबत स्थानिक रहिवाशांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असून प्रभाग क्रमांक १००च्या स्थानिक नगरसेविका असलेल्या भाजपच्या स्वप्ना म्हात्रे यांनी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर हे काम हाती घेत येथील रहिवाशांना पूरपरिस्थितीच्या कराव्या लागणाऱ्या सामन्यातून कायमची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.
एच पश्चिम विभाग व पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केल्यानंतर रेल्वे वसाहतीसह रेल्वे वसाहतीच्या बाहेरील बाजूस एस.व्ही. रोड येथेही पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे आढळून आले. या वसाहतीतील पावसाचे पाणी येथून जाणाऱ्या नाल्यामूधन रेल्वे कल्व्हर्टला जावून मिळते. त्यामुळे रेल्वे कल्व्हर्टला वसाहतीमधून जाणाऱ्या नाल्याचे पुनर्बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. जेणेकरून पावसाळ्यात वाहून जावून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाची क्षमता अधिक असेल.
त्यामुळे याबाबत महापालिकेच्या BMC पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या माध्यमातून निविदा मागवण्यात आल्या. यामध्ये या कामासाठी विकाश एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीने महापालिकेच्या BMC अंदाजित दरापेक्षा २७ टक्के उणे दराने बोली लावत हे काम मिळवले आहे. त्यामुळे या कामासाठी ३ कोटी ६७ लाख रुपये खर्च होणार आहेत. विशेष म्हणजे या कंपनीने यापूर्वी पूर्व उपनगरांमधील छोट्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम केले असून गाळ काढणाऱ्या कंपनीला नाल्याच्या पुनर्बांधणीचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाला या नाल्यातील गाळ काढायचा आहे की नाल्याचे रुंदीकरण करून त्याचे बांधकाम करायचे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
(हेही वाचा BMC : महापालिकेतील सुमारे १० कार्यकारी अभियंत्यांच्या बढतीचे प्रस्ताव रोखले कोणी)
Join Our WhatsApp Community