BMC : महापालिकेच्या शाळांचा आता गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पुढाकार

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीचा, शैक्षणिक गुणवत्तेचा अभ्यास करून सादर केलेल्या अहवालात शिक्षण घेण्यात समस्या निर्माण झाली असल्यास त्याची कारणे, त्या समस्येवरील उपाय आदी समिती सादर करणार आहे.

159
bmc school

इतर शहरांमधील तसेच जिल्ह्यांमधील खासगी शाळांपेक्षा मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांवर सर्वांत जास्त खर्च महापालिका प्रशासन करत असले तरी महापालिका शाळांमधील मुलांच्या शिक्षणाबाबत आजही प्रश्नचिन्हच आहे. महापालिकेच्या शाळांमधील मुलांना इतर शाळांमधील मुलांच्या तुलनेत भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्या तरी गुणवत्तापूर्ण शिक्षणात महापालिका शाळांमधील मुलेच काहीशी मागे आहेत. त्यामुळे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतानाच त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला असून यासाठी खास मोहिम हाती घेण्यात आली. त्यासाठी महापालिका शिक्षण विभागाच्यावतीने कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षांपासून सुरु करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांमधील पटसंख्येत वाढ करण्याचे ध्येय ठेवून हाती घेतलेल्या ‘मिशन ऍडमिशन-एकच लक्ष्य-एक लक्ष’ या विशेष मोहिमेच्या भरघोस यशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने आता ‘मिशन मेरिट’ हाती घेतले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, सह आयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार यांच्या संकल्पनेतून शिक्षण विभागाद्वारे माटुंगा येथील एस.आय.ई.एस. शाळा सभागृहात ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण’ कार्यक्रम अंतर्गत चर्चासत्र संपन्न झाले. महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने या चर्चासत्राचे नियोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, सहआयुक्त अजीत कुंभार, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (लातूर)चे सहसंचालक तथा अध्यक्ष सुधाकर तेलंग, मुंबई विद्या प्राधिकरणाच्या उपसंचालक मनीषा पवार, महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि शिक्षणाधिकारी राजू तडवी, सर्व उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी, गट शिक्षणाअधिकारी (भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) दीपक कांगणे यांच्यासह निवडक मुख्याध्यापक, बिगर शासकीय संस्थांचे प्रतिनिधी तसेच शिक्षणाशी संबंधित विभाग आणि राज्यस्तरीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

(हेही वाचा Central Vista : राष्ट्रपतींनी संसद भवनाचे उद्घाटन करण्याचे निर्देश देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल)

ज्या शिक्षकांनी, मुख्याध्यापक, अधिकाऱ्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांच्या शिक्षण पद्धती, बिगर शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींनी मुलांना शिक्षणात प्रवाहात आणण्यासाठी हाती घेतलेले निरनिराळे उपक्रम आणि लातूर पॅटर्न या त्रिसूत्रीच्या आधारावर ‘मिशन मेरिट’ राबविण्यात येणार आहे. या तीनही क्षेत्रातील जाणकारांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून पुढील वर्षभराचे नियोजन केले आहे.

‘या’ विषयांवर होणार मंथन

विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, विविध शिष्यवृत्ती परीक्षा, पायाभूत साक्षरता व गणितीय संकल्पना (FLN) इयत्तेनुसार अध्ययन निष्पत्ती (LO) आदी विषयांवर विचारमंथन करण्यासाठी उप शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. या समिती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला वरील विषयांतील समस्यांवर मात करण्यासाठी ३१ मे २०२३ मे पर्यंत अहवाल सादर करणार आहेत.

आठ दिवसात तयार होणार ऍक्शन प्लॅन

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीचा, शैक्षणिक गुणवत्तेचा अभ्यास करून सादर केलेल्या अहवालात शिक्षण घेण्यात समस्या निर्माण झाली असल्यास त्याची कारणे, त्या समस्येवरील उपाय आदी समिती सादर करणार आहे. त्यानंतर, या अहवालानुसार कृती आराखडा (ऍक्शन प्लॅन) तयार करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक समितीत दहा सदस्यांचा समावेश असेल. हे सदस्य अभ्यास करून त्यावर आठ दिवसांत उपाय व उपक्रम सुचविणार आहेत.

शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभापासूनच आराखड्याची अंमलबजावणी

उप शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितींच्या अहवालावर अभ्यास करून त्यावर ऍक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच दिनांक १५ जून २०२३ पासून या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या मार्गी लावण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागणार, त्यामध्ये कोणाचा सहभाग असेल, कोणकोणते साहित्य त्यासाठी लागणार याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मुलांना दर्जेदार शिक्षण

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण, दर्जदार आणि त्याला उपयोगी ठरेल, असे शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.