मुंबईत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना ओला व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट त्याच ठिकाणी लावण्याबाबत महापालिकेने नोटीस जारी करत सूचना दिल्या आहेत. मुंबईत अशाप्रकारे एकूण ३ हजार ३६७ सोसायट्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना केल्या असून, त्यातील केवळ १ हजार ६९६ सोसायट्यांच्या आवारातच कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. तर १ हजार ६७१ सोसायट्यांमध्ये अद्यापही कचऱ्यावर प्रकिया करण्यात येत नाही. त्यामुळे यातील १ हजार ३२५ सोसायट्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याद्वारे जानेवारी २०१८ पासून आतापर्यंत ४५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी करणार कोविड सेंटरची उभारणी)
सोसायट्यांकडून अंमलबजावणी नाही
मुंबईत कोविडच्या प्रादुर्भावापासून अनेक सोसायट्यांमधील कचरा वर्गीकरण आणि आवारातच विल्हेवाट लावण्याच्या उपक्रमाकडे दुर्लक्ष होत आहे. कचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ नुसार घनकचरा व्यवस्थापन खात्याच्यावतीने निश्चित करण्यात आलेल्या बल्क वेस्ट जनरेटर असलेल्या सोसायट्यांना नोटीस बजावत त्यांना कचरा विल्हेवाटीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. परंतु या एकूण ३ हजार ३६७ सोसायट्यांपैकी ५० टक्के सोसायट्यांकडून याची अंमलबजावणी होत नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली असून, त्यानंतरही या कच-याची विल्हेवाट लावली जात नसल्याचे समोर आले. मात्र, आजही महापालिकेच्यावतीने अशा सोसायट्यांवर कठोर कारवाई होताना दिसत नाही.
(हेही वाचाः सील इमारतीच्या बाहेर पुन्हा पोलिस तैनात)
कचऱ्याबाबत दशवार्षिक आराखडा बनवणार
मुंबईसाठी विकास नियोजन आराखड्याच्या धर्तीवर महापालिकेने मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाचा दशवार्षिक आराखडा तयार करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या सूचनेनुसार महापालिकेने अर्न्स्ट अँड यंग एलएलपी यांची नियुक्ती घनकचरा व्यवस्थापनाचा दशवार्षिक आराखडा तयार करण्यासाठी केली आहे. याचा आराखडा मे २०२२च्या अखेरपर्यंत प्राप्त होणार आहे. हा आराखडा तयार करुन शून्य कचरा मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः विनामास्क फिरणा-यांवरची कारवाई पुन्हा कडक!)
Join Our WhatsApp Community