सील इमारतीच्या बाहेर पुन्हा पोलिस तैनात

सार्वजनिक आरोग्य खात्याने निर्धारित करण्यात आलेल्या कार्य पद्धतीनुसारच सील इमारतींविषयी आवश्यक ती सर्व कार्यवाही वेळच्या वेळी केली जाईल.

79

एकाच इमारतीमध्ये पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून इमारत सील करण्याची कारवाई अधिक प्रभावीपणे राबवली जावी, असे निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत. यासाठी सर्व सील इमारतींच्या गेटवर पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने निर्धारित करण्यात आलेल्या कार्य पद्धतीनुसारच सील इमारतींविषयी आवश्यक ती सर्व कार्यवाही वेळच्या वेळी केली जावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.

रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने निर्णय

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात मुंबईतील कोविड व आरोग्य विषयक बाबींची आढावा बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. मुंबईत गेल्या काही दिवसांत कोविडबाधित रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वीचे याबाबतचे अनुभव लक्षात घेता, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आपण अत्यंत सजग व सतर्क राहून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने या आधीपासूनच लागू असलेल्या नियमांनुसार, इमारतींमध्ये ५ किंवा ५ पेक्षा अधिक कोविडबाधित रुग्ण आढळून आल्यास अशी इमारत ‘सील’ करण्यात येते. या नियमाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व अधिक कठोरपणे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या बैठकीदरम्यान दिले आहेत.

(हेही वाचाः विनामास्क फिरणा-यांवरची कारवाई पुन्हा कडक!)

सहकार्याचे आवाहन

तिस-या लाटेची संभाव्यता लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून आणि कोविडचा संसर्ग इतरांना होऊ नये, या उद्देशाने प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे व ठामपणे करण्यात येत आहे. यामुळे संबंधित इमारतींमधील नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते, याची नम्र जाणीव महापालिका प्रशासनाला आहे. परंतु, कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने हे गरजेचे असून, यासाठी सर्व संबंधितांनी परिपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी महापालिका प्रशासनाद्वारे केले आहे.

असे आहेत निर्बंध

मुंबईतील ज्या इमारती सील करण्यात येतील अशा इमारतींमध्ये प्रवेश करण्यास कोणालाही अनुमती असणार नाही. तसेच  इमारतींमध्ये असणा-या कोणत्याही व्यक्तीला बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. त्याचबरोबर अशा इमारतींमध्ये विविध कामांसाठी येणारे कामगार, वाहन चालक यांना देखील सदर कालावधी दरम्यान इमारतीमध्ये प्रवेश नसेल, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

(हेही वाचाः बाप्पाच्या दर्शनाला जाणारा चाकरमानी प्रशासनाच्या ‘या’ नियमांमुळे बेजार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.