रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरामध्ये फेरीवाल्यांना व्यावसाय करण्यास बंदी असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु तरीही दादर रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या अंतरावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याऐवजी, महापालिकेचे अधिकारी ३०० मीटर दूर असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करुन, वेगळेच चित्र निर्माण करताना दिसत आहेत.
रेल्वे स्थानक परिसरामध्ये सर्व परप्रांतीय आणि भाडेकरू फेरीवाले असून, पुढील सर्व भागांमध्ये स्थानिक रहिवाशांचे व्यावसाय आहेत. परंतु परप्रांतीय आणि भाडेकरू असलेल्या फेरीवाल्यांना अभय देत महापालिकेचे अधिकारी स्थानिकांना भय दाखवत, एकप्रकारे फेरीवाल्यांच्या कारवाईचे चित्र निर्माण करत असल्याचे पहायला मिळत आहे.
(हेही वाचाः अंधेरी, पार्ल्यात चोरांचा महापालिकेला हिसका: रस्त्यावरील ‘या’ वस्तूंची होते चोरी)
सहानुभूतीच्या नावाखाली सवलत
दिवाळीच्या सणासाठी कंदिल, पणत्या, विजेचे दिवे, तोरण, पडदे, रांगोळीपासून ते कपडे आदींची दुकाने व स्टॉल्स लागलेले असून, सणासुदीच्या दिवसांच्या खेरदीसाठी दादरला लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. कोविड काळात फेरीवाल्यांचा व्यवसाय बुडाल्याने एकप्रकारे त्यांच्याबाबत सहानुभूती दर्शवली जात असली, तरी त्याचा फायदा उठवून महापालिकेचे अधिकारी त्यांना विशेष सवलत देत असल्याचे दिसून येत आहे.
गाड्या केल्या बंद
यापूर्वी दादरमध्ये सकाळी साडेदहा वाजता रेल्वे स्थानक परिसरात महापालिकेची गाडी उभी राहायची आणि त्यानंतर एक वाजता निघून जात, साडेतीन चार वाजता पुन्हा तिथे यायची. ही गाडी संध्याकाळी सात ते साडेसात वाजता निघून जायची. त्यामुळे रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरात फेरीवाले अधिक प्रमाणात दिसून येत नव्हते. परंतु महापालिकेच्या जी-उत्तर विभागाच्या परवाना विभागाच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती झाली, तेव्हापासून दादरमधील फेरीवाल्यांवरील कारवाईलाच खिळ बसली आहे. यापूर्वीचे वरिष्ठ निरीक्षक सिंह आणि भोसले यांच्या तुलनेत नवीन निरीक्षकांना प्रभावीपणे कारवाई करता येत नाही.
(हेही वाचाः स्वतः छायाचित्रकार असलेल्या मुख्यमंत्र्यांचा ‘फोकस’ इथे का वळत नाही? भाजपाचा खोचक सवाल)
कारवाईचे निर्माण होते चित्र
त्यामुळे दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांची संख्या फोफावली असून, या सर्वांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु महापालिकेचे अधिकारी दीडशे मीटर परिसरात कारवाई न करता, भलल्याच फेरीवाल्यांवर कारवाई करताना दिसत आहेत. मागील दोन दिवसांपासून जी-उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. पण प्रत्यक्षात दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई न करता, रानडे मार्गावरील डिसिल्व्हा शाळा मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कंदिल विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
कारवाई नक्की कुणासाठी?
महापालिकेच्या जी-उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या केवळ फेरीवाल्यांवर कारवाईचे चित्र निर्माण करण्यासाठी अशाप्रकारे कारवाई केली जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नगरसेविक प्रिती पाटणकर यांच्या निवासस्थानाशेजारीच असलेल्या मराठी कंदिल विक्रेत्यांवर महापालिकेच्या माध्यमातून सलग दोन दिवस कारवाई केली जात आहे. त्यामुळे ही कारवाई नक्की कुणासाठी केली जाते, असा सवाल उपस्थित होत आहे. येथील काही फेरीवाले आणि स्थानिकांच्या म्हणण्यानुसार जिथे लोकांना धड चालता येत नाही, त्या रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. पण तिथे कारवाई न करता महापालिकेचे अधिकारी केवळ दाखवायला कारवाई करतात का, असा सवाल उपस्थित होत आहे.
(हेही वाचाः फेरीवाल्यांचे सर्वेक्षण कधी होणार? ‘या’ नगरसेविकेचा आयुक्तांना सवाल)
Join Our WhatsApp Communityमी या रानडे मार्गावर मागील ४५ वर्षांपासून भाजीचा व्यवसाय करतो, तर ३२ वर्षांपासून दरवर्षी दिवाळीत कंदिल विक्रीचाही व्यावसाय करतो. पण मागील दोन दिवसांपासून केवळ तक्रार असल्याचे सांगत महापालिकेचे अधिकारी माझ्या या व्यवसायावर कारवाई करत, कंदिल जप्त करत आहेत. मी स्वत: मराठी आहे, शिवसैनिक आहे. तरीही महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक कारवाई करत आहेत का, असा मला प्रश्न पडत आहे.
-आनंद माळवदे (नाना), स्थानिक फेरीवाला