स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गंत मुंबई महापालिकेच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा ध्वजाच्या वितरण केले जात आहे. आतापर्यंत घरोघरी तिरंगा ध्वजाच्या वितरणासाठी महापालिकेने ३५ लाख ध्वजांच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली असून आतापर्यंत महापालिकेने खरेदी केलेल्या एकूण ध्वजांपैकी तब्बल दीड लाख ध्वज सदोष आढळून आले आहे. महापालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयांना पाठवलेल्या राष्ट्रध्वजांची तपासणी केली असता त्यात हे सदोष ध्वज आढळून आले. हे सदोष ध्वज पुन्हा कंत्राटदारांकडे पाठवून ते पुन्हा बदलून घेण्यात येत आहेत.
सदोष ध्वज पुन्हा कंत्राटदारांकडे
भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशभरात १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवले जाणार आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर स्वयं स्फूर्तीने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा, यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण व्हावे, या हेतूने सदर अभियान राबवले जाणार आहे. स्वातंत्र्य लढ्यातील मुंबईचे मोलाचे योगदान पाहता, महानगरपालिकेने स्वतः सर्व मुंबईकरांसाठी राष्ट्रध्वज तिरंगा खरेदी करण्याचा आणि ते घरोघरी पोहोचविण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जोमाने कार्यरत असून घरोघरी तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती देखील केली जात आहे.
( हेही वाचा : देशातील सर्वांत भव्य राष्ट्रध्वज शिवाजी पार्कमध्ये उभारा : खासदार राहुल शेवाळेंची पुन्हा एकदा सरकारकडे मागणी )
या अभियानांतर्गत महापालिकेच्यावतीने ३५ लाख ध्वजांची खरेदी करण्यात आली असून आतापर्यंत सर्व ध्वज महापालिकेला प्राप्त झाले आहे. प्रत्येक विभागाला प्राप्त होणाऱ्या ध्वजांची तपासणी करूनच दोष असलेले ध्वज बाजूला काढून सुस्थितीतील ध्वजांचे वितरण जनतेला घरोघरी जाऊन केले जाते. आतापर्यंत सुमारे २६ लाख ध्वजांचे वितरण जनतेला करण्यात आले आहे. तर सदोष असलेले दीड लाख ध्वज पुन्हा एकदा खरेदी केलेल्या कंपनीकडे पाठवून ते बदलून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. हे दीड लाख सदोष असलेले ध्वज बदलून नवीन देण्यात येत असून हे नवीन ध्वजही रविवारपर्यंत महापालिकेला प्राप्त होण्याची शक्यता असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून मिळत आहे.
खरेदी करण्यात आलेल्या ध्वजाचा आकार कमी जास्त असणे, ध्वजाच्या मधोमध असणारे अशोक चक्र एका बाजूला असणे, ध्वजाला छिद्र असणे किंवा अन्य कारणांमुळे ध्वज सदोष असल्याने ते बाजूला करून जनतेच्या हाती जाणार नाही याची काळजी महापालिकेने घेतली आहे. येत्या १३ ते १५ दरम्यान प्रत्येक घरी देशाचा तिरंगा ध्वज फडकावण्याचे आवाहन केल्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून शुक्रवारपूर्वीच या ध्वजांचे वितरण जनतेला करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community