कामाठीपुरातील ‘त्या’ महिलांसाठी महापालिकेचा असाही पुढाकार!

एकूण १ हजार देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी हे अन्नधान्याचे किट उपलब्ध होणार असून, त्यातील ५०० किटचे वाटप एक ते दोन दिवसांत केले जाणार आहे.

82

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंध तथा अंशत: लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वंचित दुर्बल घटकांतील लोकांचे हाल होत आहेत. भांडुप सोनापूरमधील ४० तृतीयपंथीयांना मदत उपलब्ध करुन देणाऱ्या महापालिकेच्या नियोजन विभागाने, आता खासगी संस्थेच्या मदतीने कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांना एक महिन्याचे रेशन किट उपलब्ध करुन दिले आहे. एकूण १ हजार देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी हे अन्नधान्याचे किट उपलब्ध होणार असून, त्यातील ५०० किटचे वाटप एक ते दोन दिवसांत केले जाणार आहे.

उपेक्षित घटकांना आधार देण्याची मागणी

मुंबईसह राज्यात अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने, हातावर पोट असणाऱ्या देहविक्री करणाऱ्या महिलांच्या रोजीरोटीचा मोठा प्रश्न निर्माण झाला. समाजातील उपेक्षित घटक म्हणूनच या देहविक्री करणाऱ्या महिलांकडे पाहिले जाते. कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आणि त्यांचे जगणे कठीण होऊन बसले. त्यामुळे या घटकाची उपासमार टाळण्यासाठी त्यांना अन्ना पाकिटे किंवा रेशन उपलब्ध करुन देण्याची मागणी सर्व स्तरांतून होत होती. काँग्रेस नगरसेविका सोनम जामसूतकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन देहविक्री करणाऱ्या महिला, तृत्तीयपंथी तसेच गरीब गरजू कुटुंबाला महापालिकेच्यावतीने नगरसेवक निधीतून अन्न पाकिटे वाटप करण्याची विनंती केली होती.

(हेही वाचाः टाळी वाजवणा-यांना मिळाले मदतीचे ‘हात’, हिंदुस्थान पोस्टच्या वृत्ताने घडला चमत्कार!)

५०० किटचे होणार एक ते दोन दिवसांत वाटप

या सर्व मागणीच्या अनुषंगाने महापालिका नियोजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ.संगीता हसनाळे यांनी पुढाकार घेत, या घटकांसाठी खासगी स्वयंसेवी संस्थांकडून अन्नधान्याचे किट प्राप्त करुन घेतले आहे. त्यामुळे संस्थांकडून प्राप्त झालेल्या या अन्न पाकिटांचे वाटप देहविक्री करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांसाठी झगडणाऱ्या ग्रेस संस्थेच्या माध्यमातून, तसेच ‘ई’ विभागाचे समाज विकास अधिकारी मनोजकुमार शितूत यांच्या देखरेखीखाली वाटप करण्यात येत आहे. कामाठीपुरा येथील या घटकासाठी १ हजार अन्नधान्याची पाकिटे उपलब्ध होणार असून, त्यातील पहिली ५०० अन्नधान्याचे किट उपलब्ध झाली आहेत. या रेशन किटचे वाटप एक ते देान दिवसांमध्ये करण्यात येणार आहे.

कामाठीपुरा येथील वंचित दुर्बल घटकातील महिलांसाठी खासगी संस्थेच्या माध्यमातून गहू, तांदुळ व इतर  रेशन साहित्यांचे किट उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच इतर भागातील तृतीयपंथी, देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी खासगी संस्थांच्या माध्यमातून ज्याप्रकारे रेशन किट उपलब्ध होतील, त्याप्रमाणे त्या-त्या वस्तीमधील या घटकांना वाटण्यात येईल.

 

-डॉ. संगीता हसनाळे, सहाय्यक आयुक्त, नियोजन विभाग

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.