BMC : ‘त्या’ प्रामाणिक सफाई कामगाराची महानगरपालिका आयुक्तांनी थोपटली पाठ; ‘अस्तित्व’ नाटकाची तिकिटे दिली भेट

7000
BMC : 'त्या' प्रामाणिक सफाई कामगाराची महानगरपालिका आयुक्तांनी थोपटली पाठ; ‘अस्तित्व’ नाटकाची तिकिटे दिली भेट

मुंबई महानगरपालिका प्रशासनातील कर्तव्यक्षमता, सचोटीची उदाहरणे अनेक अधिकारी, कर्मचारी, कामगार आदींच्या रुपाने जनतेसमोर येतात. कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणाचे असेच एक उदाहरण डी विभागातील स्वच्छता कर्मचारी सुनील कुंभार यांच्या रुपाने समोर आले आहे. महर्षी कर्वे रस्त्यावर, केनेडी पुलाजवळ स्वच्छता करीत असताना आढळलेले अंदाजे १५ तोळे सोने पोलिसांकडून सुपूर्द करून त्यांनी प्रामाणिकपणा दाखविला. त्यांच्या प्रामाणिकपणाची दखल घेत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी त्यांची पाठ थोपटली. तसेच त्यांना स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनावर आधारित ‘अस्तित्व’ नाटकाची तिकिटे भेट देत अनोखे पारितोषिकही दिले. (BMC)

कुंभार यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आयुक्त दालनात त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ प्रदान करून कौतुक केले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहायक आयुक्त (डी विभाग) शरद उघडे आदी यावेळी उपस्थित होते. (BMC)

(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या सफाई कामगाराचा प्रामाणिकपणा, सापडलेले सोने केले पोलिसांच्या स्वाधीन)

भल्या पहाटेपासून मुंबईचा कोपरानकोपरा स्वच्छ करणारे स्वच्छता कर्मचारी दररोज आपल्या नजरेस पडतात. न थांबता, न थकता हे कर्मचारी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी घाम गाळतात. महानगरपालिकेच्या डी विभागामध्ये घनकचरा व्यवस्थापन खाते अंतर्गत कार्यरत सुनील काशिनाथ कुंभार रविवार, १२ मे २०२४ रोजी महर्षी कर्वे रस्त्यावर, केनेडी पुलाजवळ स्वच्छता करीत असताना अंदाजे १५ तोळे सोने (एक सोन्याचे बिस्कीट दहा तोळे), एक सोन्याची वळी पाच तोळे) आढळून आले. त्यासोबत मूळ मालकाचा कोणताही पुरावा नसल्याचे पाहून सुनील कुंभार यांनी मुकादम बाळाराम जाधव यांच्याकडे सदर सोने सुपूर्द केले. त्यानंतर, त्यांनी नजीकच्या दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाणे येथे जावून अज्ञात व्यक्तीच्या मालकीचे १५ तोळे सोने सापडल्याची माहिती दिली. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन सदर सोने पोलीस शिपाई दीपक डावरे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबतचे पहिले वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ने प्रसिद्ध करत या सफाई कामगाराचा प्रामाणिकपणा समोर आणला होता. (BMC)

कर्मचारी सुनील कुंभार आणि मुकादम बाळाराम जाधव यांचा प्रामाणिक पाहून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी त्यांचे कौतुक तर केलेच, यासोबतच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनावर आधारित नाटकाची तिकिटे भेट दिली. तसेच संपूर्ण कुटुंबासह आवर्जून नाटकाला जा, असेही सांगितले. आयुक्त गगराणी यांनी कौतुकाने पाठ थोपटल्याने कुंभार आणि जाधव यांच्या चेहऱ्यांवर आनंद पसरला. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.