BMC : जी दक्षिण विभाग कार्यालय आवारातील नागरी सुविधा केंद्राच्या कामकाजाची आयुक्तांनी केली पाहणी

514
BMC : जी दक्षिण विभाग कार्यालय आवारातील नागरी सुविधा केंद्राच्या कामकाजाची आयुक्तांनी केली पाहणी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईकर नागरिकांना नागरी सुविधा केंद्रांच्‍या माध्‍यमातून विविध सेवा-सुविधा पुरवल्या जातात. नाग‍री सुविधा केंद्रात नागरिकांसाठी पुरेशी आसन व्‍यवस्‍था, पिण्‍याचे पाणी, अडथळाविरहित वावरता येईल अशी जागा इत्‍यादी उपलब्‍ध करून दिले पाहिजे. इंटरनेट, सर्व्‍हर, सिस्टिम सुरळीत सुरू राहील, याची दक्षता घेतली पाहिजे. कागदपत्रांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत. कमी वेळेत, कमी खर्चात नागरी सुविधा उपलब्‍ध करून द्याव्‍यात, असे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. जी दक्षिण विभाग कार्यालयाच्‍या धर्तीवर इतर सर्व नागरी सुविधा केंद्रामध्‍ये टोकन प्रणाली राबवावी, असे निर्देश देखील भूषण गगराणी यांनी दिले आहेत. (BMC)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शुक्रवारी १७ जानेवारी २०२५ जी दक्षिण विभाग कार्यालयास भेट देऊन नागरी सुविधा केंद्राच्या (CFC) कामकाजाची पाहणी केली. या नागरी सुविधा केंद्रात पहिल्‍यांदाच टोकन प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. तसेच नागरिकांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याचे गार पाणी, प्रतिसाद पेटी आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या सेवा सुविधांची गगराणी यांनी प्रशंसा केली. तसेच, नागरी सुविधा केंद्रात आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्‍यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. (BMC)

(हेही वाचा – भाजपा पाठोपाठ NCP Ajit Pawar Group चेही शिर्डीत अधिवेशन, काय चर्चा होणार ?)

महानगरपालिका आयुक्‍त गगराणी म्‍हणाले की, नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा पुरविणे, हे महानगरपालिकेचे आद्यकर्तव्य आहे, त्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे. प्रत्येक विभाग कार्यालयात (वॉर्ड) सुसज्‍ज नागरी सुविधा केंद्र आहेत. या ठिकाणी सामान्‍य मुंबईकर नागरिक विविध दाखल्‍यांसाठी – कागदपत्रांसाठी येत असतो. त्‍यामुळे याठिकाणी मोठी गर्दी असते. दोन ते तीन तास रांगेत थांबल्यानंतरही क्रमांक येईल का, याची शाश्वती नसते. कामासाठी भरपूर वेळ खर्ची पडत असल्याने प्रसंगी वादावादीचे प्रकारही घडत असल्‍याच्‍या तक्रारी आहेत. नागरी सुविधा केंद्रात होणारी गर्दी लक्षात घेऊन, नागरिकांचा त्रास कमी होण्यासाठी नियोजन केले पाहिजे. सामान्‍य नागरिक डोळ्यासमोर ठेवून नागरी सुविधा केंद्रांची रचना केली पाहिजे. नागरी सुविधा केंद्रातील कर्मचारी प्रशिक्षित, तंत्रस्‍नेही आणि सौजन्‍यशील आहेत, याची खातरजमा केली पाहिजे. (BMC)

जी दक्षिण विभाग कार्यालयाच्‍या आवारातील नागरी सुविधा केंद्राच्‍या कामकाजाचे कौतुक करताना गगराणी म्‍हणाले की, येथील नागरी सुविधा केंद्राचे कामकाज पारदर्शी आहे. टोकन प्रणालीमुळे नागरिकांच्‍या वादावादीस प्रतिबंध बसला आहे. नागरिकांकरिता आसनव्‍यवस्‍था, महिलांसाठी हिरकणी कक्ष, पेयजल सुविधा अनुकरणीय अशा आहेत. परिमंडळ उप आयुक्‍त, सर्व विभागांचे सहायक आयुक्‍त यांनी या नागरी सुविधा केंद्रास भेट द्यावी. तसेव, आपआपल्या विभाग कार्यालयांमध्ये अशाच प्रकारची यंत्रणा राबवावी, असेदखील निर्देश गगराणी यांनी दिले. परिमंडळ उप आयुक्‍तांनी आणि सहायक आयुक्‍तांनी नागरी सुविधा केंद्राला अचानक भेट देऊन कामकाजाचा आढावा घ्‍यावा, नागरिकांशी संवाद साधून त्‍यांना भेडसावणाऱ्या अडीअडचणींचे निराकरण करावे, असे निर्देश देखील महानगरपालिका आयुक्‍त भूषण गगराणी यांनी दिले. यावेळी विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी आलेल्‍या नवदाम्‍पत्‍याला गगराणी यांच्‍या हस्‍ते फूल आणि स्‍वागतपत्र देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. यानंतर गगराणी यांनी जी दक्षिण विभागातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. तसेच आवश्यक ते निर्देश दिले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.