BMC: क्लीनअप मार्शलकडून होणारी लूट अखेर थांबणार, येत्या ४ एप्रिलपासून संस्थांची सेवाच रद्द

1741
BMC: क्लीनअप मार्शलकडून होणारी लूट अखेर थांबणार, येत्या ४ एप्रिलपासून संस्थांची सेवाच रद्द
BMC: क्लीनअप मार्शलकडून होणारी लूट अखेर थांबणार, येत्या ४ एप्रिलपासून संस्थांची सेवाच रद्द

मुंबई विशेष प्रतिनिधी

BMC : मुंबईकरांची एकप्रकारे लुट करणाऱ्या क्लीन अप मार्शलबाबत (Clean up Marshall) वारंवार होणाऱ्या तक्रारी येत असल्याने त्यांना दिलेल्या दंडात्मक कारवाईचे अधिकार काढून घेत त्यांची सेवाच खंडित करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा महापालिका प्रशासनाने केली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी ही सेवा खंडित करण्याचे निर्देश दिल्यानंतर संबंधित ‘क्लीनअप मार्शल’ म्हणून नेमण्यात आलेले प्रतिनिधी आणि संबंधित संस्थांची सेवा ४ एप्रिल २०२५ पासून खंडीत करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता क्लीनअप मार्शलकडून होणारी मुंबईकरांची लूट बंद होणार असून उलट नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित संस्थांनाच दंड आकारणी करण्यात येणार आहे. (BMC)

(हेही वाचा – Clean Up Marshals आता रस्त्यावरून होणार हद्दपार

‘स्वच्छ मुंबई अभियान’ अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी, नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे, यासाठी महानगरपालिका विविध प्रकारे कार्यवाही तसेच जनजागृती करीत असते. यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘क्लीनअप मार्शल’ हा उपक्रम राबविण्यात येत होता. मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये क्लीनअप मार्शल नियुक्त करण्यात आले होते. प्रत्येक प्रशासकीय विभागात विविध १२ संस्थांमार्फत प्रत्येकी ३० क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात आली होती. या योजनेच्या अंमलबजावणीचे नियम व तत्वे देखील ठरवून देण्यात आले होते.

क्लीनअप मार्शल यांनी मागील वर्षभराच्या कालावधीमध्ये ४ कोटी ९३ लाख ७३ हजार ७१२ रुपयांचा दंड वसूल केला. हा दंड वसूल करीत असतांना संबंधीत मार्शल यांनी नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, त्यांना स्वच्छतेसंबंधित नियमांचे पालन करण्यास सांगणे अपेक्षित होते. मात्र महानगरपालिका प्रशासनाकडे प्राप्त तक्रारींनुसार संबंधित मार्शल यांनी विविध नियमांचा भंग केल्याचे दिसून आले.

(हेही वाचा – रहिवाशी वस्तीमधून सुवर्णकारांचे कारखाने हटवण्याच्या मागणीवर भुलेश्वरमधील नागरिक ठाम, BMC च्यावतीने शासनाला सादर केला जाणार अहवाल)

महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांनी कळविलेल्या ठिकाणी न जाणे, करारात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कारवाई करणे अपेक्षित नसतानाही अशा ठिकाणी मार्शल प्रतिनिधींचे सातत्याने जाणे, आठवड्याचे सातही दिवस आणि २४ तास पाहणी अपेक्षित असताना मार्शल अनेकदा गैरहजर असल्याचे निदर्शनास येणे, बायोमेट्रीक हजेरीबाबत उदासीनता, नियमभंग करणाऱ्या नागरिकांकडून दंडाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारणे, आपल्या कक्षेबाहेरील परिसरात जावून पाहणी करणे, हॉटेल्स, बँक्वेट हॉल तसेच होर्डिंग आणि फलक आदी बाबी करारात नसतानाही तेथून दंड आकारणे यासह करारपत्रानुसार अटी व शर्थींचे पालन न करणे आदी बाबी महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. तसेच, गत वर्षभरात क्लीनअप मार्शल यांच्या असभ्य वर्तवणुकीमुळे महानगरपालिकेच्या प्रतिमेलाही धक्का बसत होता.

त्यामुळे ‘स्वच्छ मुंबई अभियान’ (Swachh Mumbai Mission) अंतर्गत मुंबईत स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या क्लीनअप मार्शलच्या संस्थांचा करार ४ एप्रिल २०२५ पासून रद्द करण्यात येणार आहे. ४ एप्रिल २०२५ पासून संबंधीत संस्थांचे सर्व प्रशासकीय विभागांतील काम रद्द करण्यात येणार आहे. तसेच मुंबईकर नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित संस्थांना दंड आकारणीही करण्यात आली आहे. तरीही ४ एप्रिल २०२५ नंतर या ‘क्लीनअप मार्शल’कडून दंड आकारणी होत असल्यास नागरिकांनी संबंधीत प्रशासकीय विभागाशी (वॉर्ड ऑफिस) संपर्क साधावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

(हेही वाचा – आशियातील सर्वात मोठा झोजिला बोगद्याचे 70 टक्के काम पूर्ण; Minister Nitin Gadkari यांची माहिती)

मुंबईत (Mumbai) स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या क्लीनअप मार्शलच्या संस्थांचे काम थांबविण्यात येत असले तरी  ‘स्वच्छ मुंबई अभियाना’ची अंमलबजावणीचे सुरू राहणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेकडून लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर (Kiran Dighavkar) यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.