-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मागील पावसाळ्यात चुनाभट्टी, कुर्ला तसेच शीव आदी रेल्वे मार्गावर पाणी साचून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. याबाबत महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत असून हायवे सोसायटीकडून येणारे पावसाळी पाणी २ उच्च क्षमतेचे पंप लावून नाल्यामध्ये सोडण्यात येणार आहे, जेणेकरून हे पाणी चुनाभट्टी रेल्वे स्थानक दिशेला जाणार नाही. मात्र, या उपाययोजनेमुळे पाणी वहनाची परिणामकारकता १०० टक्के राहील, याबाबत साशंकता असल्याने चुनाभट्टीकडे जाणारी पावसाळी जलवाहिनी ही महामार्ग ओलांडून झोपडपट्टी क्षेत्राबाहेर रेल्वे हद्दीतून बाहेर काढणे आणि पुढे ही जलवाहिनी पश्चिमेकडील अस्तित्वातील नाल्यास जोडावी असा पर्याय पुढे आला आहे. (BMC)
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अलीकडे म्हणजे १८ फेब्रुवारी २०२५ रोजी पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत रेल्वे प्रशासनातर्फे मध्य रेल्वे मार्गावरील चुनाभट्टी, भांडुप रेल्वे स्थानकांबाबत काही मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. या मुद्यांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी मंगळवारी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी महानगरपालिका पर्जन्य जलवाहिन्या खाते, पूल खाते आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महाराष्ट्र नगर सब वे येथील लघु उदंचन केंद्रात ५ बाय ५ मीटर क्षमतेची साठवण टाकी (संप) आहे. या साठवण टाकीची क्षमता १५ बाय ६ मीटर करणे आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेच्या जमिनीवर बांधकाम करावे लागणार आहे. रेल्वे विभागाशी समन्वय ठेवून निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण केली तर दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत जलद गतीने काम होईल, हे सुनिश्चित करावे, अशा सूचना विभागास देण्यात आल्या. (BMC)
(हेही वाचा – Mantralaya च्या सुरक्षा जाळीवर उडी घेत तरुणाचं आंदोलन)
चुनाभट्टी रेल्वे स्थानकाबाबत पर्जन्य जलवाहिनी विभागाने पर्याय सुचवले असले तरी अतिरिक्त पावसाळी पाणी मिठी नदीकडे वळविणे असा पर्याय सुचविण्यात आला. हा प्रस्ताव व्यवहार्य वाटल्यास त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले. तसेच उषा नगर (भांडूप) येथे पूल विभागामार्फत पूल तथा कल्वर्टचे काम सुरू आहे. त्या ठिकाणची समांतर जलवाहिनी स्थलांतरीत करून छोटा पूल पाडणे आत्यंतिक आवश्यक आहे, अन्यथा मागील वर्षाच्या पावसाप्रमाणे यंदादेखील पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. १५ मे २०२५ पर्यंत जलवाहिनी स्थलांतर केली जाईल तसेच जीर्ण पूल निष्कासन करण्याबाबत दक्षता घेतली जाईल, असे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले. (BMC)
माटुंगा येथे रेल्वे विभागाकडून रूळाखालून पावसाळी जलवाहिनी विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, त्याची लांबी ८०० मीटरपर्यंत वाढवावी जेणेकरून त्याची उपयुक्तता वाढेल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) बांगर म्हणाले की, पावसाळ्यास ३ महिन्यांची अवधी आहे. तत्पूर्वी, या कालावधीत रेल्वे विभाग आणि महानगरपालिका यांच्यात उच्च प्रतीचा समन्वय ठेऊन कमीतकमी कालावधीत कामे पूर्ण करावीत. जेणेकरून रेल्वे रूळांवर पाणी साचण्याच्या घटना टाळता येतील. उपनगरीय रेल्वेसेवा पावसाळ्यात बाधित होणार नाही, अशारितीने सर्व कामे चोखपणे पूर्ण करावीत. जोरदार पावसामुळे रेल्वे मार्गांवर पाणी तुंबणार नाही, यासाठी पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपसा पंप बसवावेत. जेणेकरून पाऊस जास्त झाल्यास पाण्याचा तत्काळ निचरा करता येईल. रेल्वे अंतर्गत असलेल्या ठिकाणी गाळ, कचरा, राडारोडा उचलण्यात यावा; नियमितपणे नाले स्वच्छता करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community