- सचिन धानजी,मुंबई
मुंबईत एका बाजुला सौंदर्यीकरणाच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च केले गेले असून यावरून महापालिका प्रशासन टिकेचे धनी होत आहे. मुंबईकरांना हे सौंदर्यीकरण पचनी पडलेले नसून यासाठी केला जाणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वायफळ असल्याची चर्चा जनतेमध्ये होत असतानाच मुलुंड टी विभागातील काही विद्युत रोषणाई आणि रंगरंगोटीची कामे मंजूर झाल्यानंतरही आवश्यक नसल्याने रद्द करून कोटयवधी रुपये वाचवण्याचा प्रयत्न महापालिकेच्या प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून झाल्याचे दिसून येत आहे. मुंबई सौदर्यीकरण प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या मुलुंड टी विभागातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंड टोल नाका पादचारी पूल, म्हाडा नवघर जंक्शन उड्डाणपूल पुलाखाली, तसेच ऐरोली नाहूर जंक्शन उड्डाणपुलाखाली कायमस्वरुपी रंगीत रोषणाईचे काम करण्याबाबत २ कोटी २८ लाख ८७ हजार रुपयांच्या निविदा मागवण्यात आल्या. यामध्ये योगिराज पॉवरटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली होती. (BMC)
या कंपनीने २ कोटी ०५ लाख ९८ हजार रुपयांची बोली लावून हे काम मिळवले होते. यामध्ये तिन्ही कामांचा कार्यादेशही देण्यात आला होता. परंतु यात काही तांत्रिक बाबी असल्याने महापालिका परिमंडळ सहाचे तत्कालिन उपायुक्त देवीदास क्षीरसागर यांच्या मंजुरीने दोन कामे रद्द करण्यात आली. यामध्ये पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड टोल नाका पादचारी पुल येथे विद्युत रोषणाई व पुढील चार वर्षांची देखभाल याकरता ८१ लाख ६४ हजार रुपये खर्च केले जाणार होते. परंतु याच ठिकाणी सागर लूप या संस्थेने जाहिरात लावण्यासाठी एमएमआरडीए सोबत करार केला असून त्यात टोलनाका पादचारी पूल येथे स्वखर्चाने विद्युत रोषणाई करणार आहेत. त्यामुळे हे काम वगळण्यात आले आहे. (BMC)
(हेही वाचा – Uday Samant : सरकार घेणार राज्यातील मोठ्या शहरांमधील शासकीय रुग्णालयांतील सोयी-सुविधांचा आढावा)
तर पूर्व द्रुतगती महामार्गावरील ऐरोली नाहूर जंक्शन उड्डाणपूलाखाली विद्युत रोषणाई व पुढील चार वर्षांच्या देखभालीसाठी महापालिकेच्यावतीने सुमारे ५० लाख रुपये खर्च केले जाणार होते. परंतु फसाड लाईटींगच्या माध्यमातून विद्युत रोषणाई करण्यासाठीचा पृष्ठभाग हा एकाच रंगात असणे आवश्यक असते. परंतु या पुलाखाली यापूर्वीच एक्वारियम, पाण्याखालील जलजीवनावर आधारीत विविध रंगाच्या सहाय्याने चित्रे चितारण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रांवर फसाड लाईटींग फारशी प्रभावी दिसणार नाही. त्यामुळे परिणामी परिमंडळ सहाचे तत्कालिन उपायुक्त देवीदास क्षीरसागर यांनी तेही काम रद्द केले. त्यामुळे महापालिकेच्या टी विभागातील अधिकाऱ्यांनी डोळे बंद करून काम करण्याचा प्रयत्न केलेला असतानाच परिमंडळ ६च्या उपायुक्तांनी योग्यप्रकारे लक्ष देत किमान दीड कोटी रुपयांचा अनावश्यक होणारा खर्च टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिकेच्यावतीने या नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून नवघर जंक्शन उड्डाणपुलाखाली विद्युत रोषणाईचे काम करण्यात आले असून पुढील चार वर्षांच्या देखभालीसह यासाठी विविध करांसह ५१ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community